मुंबई : प्रतिनिधी
विधिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांची खुर्ची वेगळी आहे. मातोश्रीमध्ये बसून आदेश सोडणं सोप्पं असतं. विधिमंडळात प्रश्नांची अधिकृत उत्तरे द्यावी लागतात. त्यामुळे आता विधानसभेचं घोडा मैदान दूर नाही. आम्ही विरोधक म्हणून महाराष्ट्राच्या न्यायहक्कासाठी गोळा बारूद घेऊन सज्ज आहोत, असा इशारा नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. शपथविधीनंतर बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे, तसेच त्यांनी विधानभवनात पहिल्यांदा आमदार म्हणून पाऊल ठेवणार्या ठाकरेंना शुभेच्छाही दिल्या आहेत. मला अभिमान आहे, मी ज्या पक्षाच्या आमदारकीची शपथ घेतली त्या पक्षाने कोणाची लाचारी केली नाही. जेव्हा आमच्याकडे समर्थन नव्हतं तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. त्यासाठी आम्हाला पंचतारांकित हॉटेलची गरज लागली नाही. आम्ही कोणाचे तळवे चाटले नाहीत. कोणाची लाचारी पत्करली नाही. त्यामुळेच मला भाजपसोबत असल्याचा अभिमानच असल्याचंही नितेश राणे म्हणाले. अजित पवारांवर विचारलेल्या प्रश्नावर नितेश राणे यांनी अजितदादांच्या बाबतीत त्यांचं घर तुटलं नाही यासाठी मी समाधानी असल्याचं सांगितलं. बाकी राजकारण होतच राहतं, पण कुठलंही कुटुंब तुटता कामा नये, असेही नितेश राणे म्हणाले.