पोलादपूर : प्रतिनिधी
शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचलित येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाविद्यालयाचे संस्थापक व महाराष्ट्राचे माजी ग्रामविकास मंत्री स्वर्गीय प्रभाकर मोरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
महाड येथील जनकल्याण रक्तपेढीच्या विशेष सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरास शिवाई शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अॅड विनोद देशमुख, शिवाई नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक दशरथदादा देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य माजी राजिप उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य चंद्रकांत कळंबे, पोलादपूरचे उपनगराध्यक्ष सिध्देश शेठ, सामाजिक कार्यकर्ते गोपाळ शिंदे, संजय चव्हाण, प्रशांत मोरे आदी मान्यवरांनी भेट देऊन रक्तदात्यांचे अभिनंदन केले. या वेळी अॅड. विनोद देशमुख व चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या महिला तंत्रज्ञ जाधव, वसावे उपस्थित राहिले. शिबिरासाठी जनकल्याण रक्तपेढी महाडच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बुटाला, तंत्रज्ञ रविकांत शिंदे आदींचे विशेष सहकार्य लाभले.