महाड : प्रतिनिधी
महाड व माणगाव हद्दीतील सावित्री नदीवरील तिन्ही मोठ्या पुलांची दुरुस्ती केली जात आहे. हे तिन्ही पूल 1980च्या दशकात बांधण्यात आले असून सावित्री पूल दुर्घटनेनंतर या तिन्ही पुलांचे निरीक्षण करण्यात आले. यात या पुलांच्या पायामध्ये दुरुस्ती करण्याचे सुचवण्यात आले होते. त्यानुसार सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यात आंबेत व टोळ या दोन्ही पुलांचे बेअरिंग बदलण्यासाठी हे पूल उचलले जाणार आहेत. यामुळे काही दिवस वाहतुकीसाठी आंबेत पूल पूर्णवेळ बंद राहण्याची शक्यता आहे.
महाडजवळील सावित्री नदीवरील पूल सन 2016मध्ये वाहून गेला. या दुर्घटनेत मनुष्यहानी झाली. यानंतर संपूर्ण देशभरात याचे पडसाद उमटले. शासनाने जुन्या पुलांचे निरीक्षण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महाडनजीक सन 1980मध्ये बांधण्यात आलेले दादली, टोळ, भावे, बिरवाडी आणि माणगावमधील आंबेत पुलाचे सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये टोळ, आंबेत आणि दादली या पुलांचे पाण्याखालील भागाचे निरीक्षण व तपासणीनंतर या पुलांच्या पायाला दुरुस्तीची गरज असल्याचे निरीक्षण करणार्या एजन्सीने सुचवले. त्यानुसार पुलांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यात आला व त्याला मंजुरीही प्राप्त झाली. आंबेत पुलाकरिता साडेनऊ कोटी, टोळ पुलाकरिता अडीच कोटी, तर दादली पुलाकरिता साडेसहा कोटी रुपये मंजूर झाले. दादली, टोळ आणि आंबेत हे तिन्ही पूल सावित्री नदीवरील मोठे पूल आहेत. यावरून सातत्याने अवजड वाहनांची व प्रवाशी वाहनांची वर्दळ असल्याने याची दुरुस्ती प्राधान्याने करणे आवश्यक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम त्वरित सुरू केले आहे.
आंबेत पुलावरील कठड्याची दुरुस्ती केली जात असून यादरम्यान अवजड वाहतूक बंद करण्यात आली. ही वाहतूक महाडमार्गे वळवण्यात आली. आंबेत पुलाच्या बेअरिंग दुरुस्तीसाठी पुलाचे भाग उचलावे लागणार आहेत. यात अचूकता सांभाळणे महत्त्वाचे आहे. एक चूकदेखील महागात पडू शकते. हा पूल दुरुस्त करणे एक आव्हानच असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बी. एन. बहिर यांनी सपष्ट केले. आंबेत व दादली पुलाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. टोळ पुलाच्या पायालाही उभ्या भेगा पडल्या आहेत. या भेगाही आधुनिक पद्धतीने भरल्या जाणार आहेत. बाहेरून काँक्रीटचे आवरण केले जाणार आहे. या पुलाच्याही बेअरिंग बदलल्या जाणार आहेत. तसेच अशाच प्रकारचे काम दादली पुलाचेही करण्यात येणार आहे. दादली पुलाचा पाया आणि खालील खडक यादरम्यान तयार झालेली पोकळी काँक्रीटच्या साह्याने भरली जाणार आहे.
आंबेत, टोळ आणि दादली या तिन्ही पुलांची दुरुस्ती आधुनिक पद्धतीने केली जाणार आहे, मात्र यातील टोळ आणि आंबेत हे पूल बेअरिंग बदलण्यासाठी उचलले जाणार आहेत. यामुळे अचूकपणे काम करणे हे आमच्यापुढे आव्हानच आहे.
-बी. एन. बहिर, कार्यकारी अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड