Breaking News

वन विभागाकडून कर्नाळा अभयारण्य प्लास्टिकमुक्त

संपूर्ण पक्षी अभयारण्य प्लास्टिकमुक्त झाले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून 12 किमी अंतरावर आहे. कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पक्षी वैविध्याने समृद्ध असल्याने 12.11 चौ. किमीच्या क्षेत्राला राखीव वनक्षेत्राचा दर्जा घोषित झाला. हे स्थानिक आणि स्थलांतरीत पक्ष्यांचे माहेरघर असल्याने दिवसरात्र येथे पक्ष्यांचे संमेलन भरलेले दिसते. पक्ष्यांसाठी जाहीर करण्यात आलेले हे महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य आहे. येथे 147 प्रजातींचे पक्षी आपण पाहू शकतो. ज्यामध्ये 37 प्रकारचे पक्षी हे स्थलांतरीत किंवा प्रवासी पक्षी आहेत. या अभयारण्यात विविध प्रकारच्या 642 वृक्षप्रजाती वेली, दुर्मीळ औषधी वनस्पती आहेत. मोठ्या वृक्षांबरोबर झुडूपवर्गीय वनस्पतीही येथे मोठ्या प्रमाणात आहेत.

पक्षी निरीक्षणाशिवाय या अभयारण्यातील मुख्य आकर्षण म्हणजे कर्नाळा किल्ला आहे. किल्ल्याकडे जाणारी निसर्गवाट कठीण व खडकाळ जागेतून असल्याने ट्रेकर्स आणि गिर्यारोहकांसाठी हा किल्ला मोठे आकर्षण आहे. राष्ट्रीय महामार्गापासून पूर्वेकडील भागात असणार्‍या हरियाल व मोरटाका या निसर्गवाटा (नेचर टेल) पक्षीनिरीक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाटा आहेत. अभयारण्याच्या राष्ट्रीय महामार्गापासून पश्चिमेकडील आणखी एक निसर्गवाट म्हणजे गारमाळ, या वाटेवर अनेक वैविध्यपूर्ण वनस्पती अस्तित्वात आहेत.

पक्षी अभयारण्यास दररोज आणि सुटीच्या दिवशी हजारो पर्यटक भेट देत असतात. अभयारण्यात जाताना ते खाण्याचे पदार्थ, पाणी घेऊन जातात. त्यासोबत अभयारण्यात नेल्या जाणार्‍या प्लास्टिकने वन्यजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत होता. शिवाय पर्यावरणाला नुकसान पोहचत होते. यावर उपाययोजना करण्यासाठी उपवनसंरक्षक, वन्यजीव ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कर्नाळा आणि वन कर्मचार्‍यांनी अभयारण्यालगतच्या गावातील समित्यांची बैठक घेतली. त्यांच्याशी चर्चा करून अभयारण्यात जाताना पर्यटकांच्या साहित्याची तपासणी करून त्यांच्याकडे असलेल्या प्लास्टिकची नोंद घेतली जाऊ लागली. प्लास्टिकचे सामान असल्यास त्याबदल्यात त्यांच्याकडून सुरुवातीला 200  रुपयांची अनामत रक्कम ठेवून घेतली जाऊ लागली. ते अभयारण्यातून परत येताना त्यांनी नेलेले सर्व प्लास्टिकचे सामान परत आणल्यास अनामत म्हणून ठेवलेली 200 रुपयांची रक्कम त्यांना परत केली जाऊ लागली, परंतु एखाद दुसर्‍या पाण्याच्या बाटलीसाठी 200 रुपयांची अनामत रक्कम ठेवण्यास पर्यटक विरोध करीत. त्यामुळे ही रक्कम 100 इतकी करण्यात आली. अभयारण्यातून परत येताना पर्यटकांनी नोंद केलेले प्लास्टिक परत न आणल्यास त्यांची अनामत रक्कम जप्त करून घेतली जाते. याला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामपरिस्थितीकीय विकास समिती कल्हे यांच्यामार्फत उपद्रवशुल्क वसूल केले जाते. त्यातून या समितीकडून रोजंदारी मजूर लावून पर्यटकांकडून अनावधानाने राहिलेला कचरा दर सोमवारी उचलला जाऊन त्याची विल्हेवाट लावली जाते. प्लास्टिकची पाण्याची बाटली आणि शीतपेयाच्या बाटल्यांची अनामत रक्कम वसूल करण्यासाठी अभयारण्यातील तीन बचतगटांना सूचना देण्यात आल्या आहेत.

कर्नाळा पक्षी अभयारण्य प्लास्टिकमुक्त व्हावे म्हणून विविध महाविद्यालये, शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. त्यांच्यामार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. रोटरी क्लबच्या विविध शाखांमधील पदाधिकार्‍यांचाही यात समावेश आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य प्रत्येक रविवारी किल्ल्यावर उपस्थित राहून आजूबाजूचा परिसर स्वच्छ करतात. या सर्वांच्या सहकार्याने आणि शिस्तीला सवयीची जोड दिल्याने कर्नाळा अभयारण्य क्षेत्र स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त करण्यात यश आले आहे.

-डॉ. सुरेखा मुळे, वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती)

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply