Monday , February 6 2023

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा : भारतीय संघाला सुवर्णपदक

काठमांडू : वृत्तसंस्था

किदम्बी श्रीकांतच्या नेतृत्वाखाली भारताच्या पुरुष संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा 3-1 असा पाडाव करून दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेमधील बॅडमिंटनचे सुवर्णपदक पटकाविले. महिला संघाने पाकिस्तानचा 3-0 असा धुव्वा उडवून अंतिम फेरी गाठली आहे.

पुरुषांच्या लढतीत श्रीकांतने दिनुका करुणारत्नेचा 17-21, 21-15, 21-11 असा पराभव केला. मग सिरिल वर्माने भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली; कारण सिरिल 21-17, 11-5 असा आघाडीवर असताना प्रतिस्पर्धी सचिन डायसने माघार घेतली. त्यानंतर अरुण जॉर्ज व सन्याम शुक्ला जोडीने सचिन व बी. थरिंदू डुंबूकोलाकडून हार पत्करली, पण अखेरच्या लढतीत कृष्णा प्रसाद गंरगा व धृव कपिलाला 21-14, 21-18 असा पाडाव केला.

भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी श्रीलंका, नेपाळ व बांगलादेशला पराभूत करून दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील खो-खो क्रीडा प्रकारातील उपांत्य फेरीमधील स्थान पक्के केले आहे.

अव्वल साखळी पद्धतीने झालेल्या पुरुषांच्या सामन्यात भारताने नेपाळवर 17-5 असा एक डाव व 12 गुणांनी धमाकेदार विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या दीपक माधवने संरक्षण करताना तीन मिनिटे 30 सेकंद पळतीचा खेळ केला व आक्रमणात तीन गडी बाद केले. तपन पालने संरक्षणात तीन मिनिटे पळतीचा खेळ केला व आक्रमणात दोन खेळाडू बाद केले. नेपाळच्या बुद्धकुमार थापा व मिलन रायने चांगला खेळ केला.

महिला गटात भारताने नेपाळवर 11-3 असा एक डाव व आठ गुणांनी पराभव केला. भारताच्या पहिल्या डावात मुकेश तीन मिनिटे 10 सेकंद संरक्षण करून बाद झाली. त्यानंतर प्रियंका भोपीने नाबाद पाच मिनिटे 50 सेकंद संरक्षण केले. दुसर्‍या डावात अपेक्षा सुताराने संरक्षण करताना तीन मिनिटे पळतीचा खेळ केला व आक्रमणात एक खेळाडू बाद केला. त्यानंतर कृष्णा यादवने संरक्षण करताना दोन मिनिटे 40 सेकंद पळतीचा खेळ केला. शेवटी ऐश्वर्या सावंतने नाबाद खेळी करताना तीन मिनिटे रक्षण केले. कर्णधार नसरीनने चार खेळाडूंना बाद करून योगदान दिले.

ट्रायथलॉनमध्ये चार पदके नेपाळमध्ये सुरू असलेल्या 13व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने ट्रायथलॉन प्रकारात एक सुवर्णपदक, दोन रौप्यपदके आणि एक कांस्यपदक जिंकून एकूण चार पदकांची कमाई केली. पुरुषांच्या ट्रायथलॉन प्रकारात आदर्श एम. एन. सिनिमोलने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले, तर प्रतिस्पर्धी ईश्वरजीत सिखॉमला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या वैयक्तिक ट्रायथलॉन प्रकारात भारताच्या थौडाम सरोजिनी देवीने रौप्यपदक आणि मोहन प्रज्ञाने कांस्यपदक पटकाविले.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply