पाली देवद (सुकापूर) पाणीपुरवठा समिती गैरव्यवहार
पनवेल : रामप्रहर वृत्त
पाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायत अंतर्गत पाणीपुरवठा समितीने केलेल्या गैरव्यवहारप्रकरणी रायगड जिल्हाधिकार्यांनी शेकापच्या दोन ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविले आहे. हेमलता नरेश केणी आणि मोनिका संदीप म्हसकर अशी अपात्र ठरविण्यात आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची नावे आहेत.
पाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायत अंतर्गत पाणीपुरवठा समितीने केलेल्या भ्रष्टाचारप्रकरणी जि.प.सदस्य अमित जाधव, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांचे जनसंपर्क अधिकारी के. जी. म्हात्रे यांनी रायगड जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे भ्रष्टाचाराचे पुरावे दाखल करून या संपूर्ण गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला होता. त्यात शेकापच्या ग्रामपंचायत सदस्य हेमलता केणी यांचे पती नरेश काळूराम केणी यांनी कोणतेही काम न करता त्यांच्या नावे डे्रनेज कामासाठी 3 जुलै 2017 रोजी 1 लाख 53 हजार 25 रुपये व 16 मे 2017 रोजी एक लाख रुपये अशी दोन वेळा रक्कम काढून या निधीचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आणण्यात आले.
अशाच प्रकारे दुसर्या ग्रामपंचायत सदस्य मोनिका म्हसकर यांचे पती संदीप भगवान म्हसकर यांनीही कोणतेही काम न करता त्यांच्या नावे डे्रनेज कामासाठी 19 सप्टेंबर 2016 या एकाच दिवशी दोन वेळा एक लाख अशी एकूण दोन लाखांची रक्कम काढून त्या निधीचा गैरवापर केला. या दोन्हीबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता.
ग्रामपंचायत सदस्य हेमलता केणी आणि मोनिका म्हसकर यांच्या पतीच्या नावे कामे दाखवून ग्रामनिधीचा गैरवापर केल्याने राजेश पाटील यांनी या दोन ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959मधील कलम 14 नुसार रायगड जिल्हाधिकार्यांकडे अपील दाखल केले होते. जिल्हाधिकार्यांनी केणी व मोनिका या दोघींनाही सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरविले आहे. या दोन्ही विवादाचे काम अॅड. विनायक कोळी यांनी पाहिले. भ्रष्टाचाराला लगाम बसल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.