बालके, गर्भवती मातांसाठी विशेष लसीकरण
पनवेल : बातमीदार
लसीकरणापासून वंचित राहिलेली शुन्य ते दोन वर्ष वयोगटातील बालके, तसेच गर्भवती मातांना पुन्हा विविध प्रकारच्या लस देण्यासाठी केंद्र सरकारने मिशन इंद्रधनुष्य हाती घेतली आहे. हे मिशन राबविण्यासाठी पनवेल महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. हे लसीकरण सोमवारपासून सुरू झाले असून, डिसेंबर ते मार्च या चार महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक महिन्याच्या पहिला आठवड्यात ते केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यांत आणि 20 महापालिकांमध्ये आयएमआय 2.0 या लसीकरणासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य राबविण्याचे ठरविले आहे. पनवेल महापालिकेने हे मिशन यशस्वी करण्यासाठी पावले उचलली आहेत. यापूर्वी झालेल्या लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेल्या किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांसाठी ही मोहीम उपयुक्त ठरणार आहे. बालमृत्यूचे प्रमाण व आजार कमी करण्यासाठी हे लसीकरण प्रभावी ठरणारे आहे. त्या अंतर्गत नवजात ते दोन वर्षांच्या बालकास 60 वेगवेगळ्या प्रकारच्या लसी दिल्या जाणार आहेत. याशिवाय गर्भवती महिलांनादेखील लसीकरण केले जाणार आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. गणेश देशमुख यांनी नुकतीच आरोग्य विभागातील कर्मचारी अधिकार्यांची बैठक घेऊन या मोहिमेविषयी मार्गदर्शन केले. मिशन इंद्रधनुष्यबाबत माहिती देताना पनवेल महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन जाधव यांनी सांगितले की, या मोहिमेतंर्गत महापालिका क्षेत्रातील सर्व बालकांना आयएमआय 2.0 लस दिली जाणार आहे. त्यासाठी आरोग्य कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, संबंधितांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा.