सायन-पनवेल महामार्गावर पोलिसांचा कडक बंदोबस्त
पनवेल : वार्ताहर
राज्यात जिल्हा बंदी असूनदेखील बिनदिक्खतपणे या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात फिरणार्यांवर आता पोलिसांनी कडक कारवाईला सुरुवात केली आहे. यांचा प्रारंभ कामोठे पोलिसांनी केली आहे. सायन-पनवेल महामार्गावर मुंबईच्या दिशने जाणार्या मार्गावर मॅक डोनाल्डच्या विरुद्ध दिशेला नाका बंदी सुरू करून, वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. ज्या वाहन चालकांकडे ई-पास नसेल अशा वाहनांना मुंबईत जाण्यास परवानगी नाकारण्यात येत आहे. कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. अत्यावशक असेल तरच घरातून बाहेर पडण्याचा सूचना करण्यात आल्या आहेत, त्या सोबत एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात जाण्यासाठी बंदी घातली आहे. अत्यावश्यक सेवेतील सेवांना जिल्हाबंदीतून वगळण्यात आले आहे. त्या सोबत अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आला आहे, मात्र काही बेजबाबदार नागरिक अशा सूचनांना हरताळ फसताना दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे, मात्र आता पोलिसांनी अशा बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करण्याची सुरुवात केली आहे.
कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक स्मिता जाधव यांनी घरातून विनाकारण रस्त्यावर फिरणार्यांवर कारवाई करून हजारो रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईनंतर आता सायन-पनवेल महामार्गावर नका बंदी करून जिल्हाबंदीचे उल्लंघन करणार्या वाहनांवर कारवाईला सुरुवात केली आहे. ई-पास शिवाय फिरणार्या वाहनांना मुंबईत प्रवेश दिला जात नाही.
सायन-पनवेल महामार्गावरील मॅकडोनाल्डच्या विरुद्ध दिशेला नाका बंदी करून, या वाहनांची तपासणी केली जात आहे. आणि प्रवासाचे कारण विचारून सोडले जात आहे. अनावश्यक फिरणार्यांवर कारवाईदेखील केली जात आहे. यासाठी स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव रस्त्यावर उतरल्या आहे.