खोपोली : प्रतिनिधी
नगर परिषदेकडून खोपोली शहरात स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छतेबाबत जोरदार मोहीम सुरू आहे. यात प्लास्टिक बंदी मोहीम राबविणे, कचरा विलीनीकरण, कचरा संकलन व त्याचे वर्गवारीनुसार निस्तारण आदी कामे सुरू आहेत. या कामांची प्रगती व नागरिकांच्या अडचणी व तक्रारी यांचा दैनंदिन आढावाही घेतला जात आहे. दरम्यान, एखाद्या रहिवासी भागात किंवा सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छतेबाबत तक्रार आल्यावर त्याची तत्काळ दखल घेतली जात आहे. याबाबत कामाची प्रत्यक्ष पाहणी व नागरिकांशी संवाद साधण्यासाठी मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्याकडूनही वेळोवेळी पाहणी केली जात आहे. यादरम्यान काही त्रुटी असल्यास त्याबाबत सूचना करून त्या त्रुटी नष्ट केल्या जात आहेत.