पनवेल ः बातमीदार
नवी मुंबई विमानतळासाठी सिडकोने आता गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती पाडण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी कोंबडभुजे गावातील शाळा पाडण्यात आली असून बुधवारी उलवेमधील शाळेवर कारवाई करण्यात येणार आहे.
विमानतळासाठी लागणारी 70 टक्के जागा सिडकोला सहजपणे मिळाली. मात्र उरलेल्या 30 टक्के जागेसाठी सिडकोला मोठा संघर्ष करावा लागला. या जागेवर राहत असलेल्या ग्रामस्थांबरोबर वाटाघाटी कराव्या लागत आहेत. डिसेंबर 2019पर्यंत विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील काम होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ते शक्य नसल्याचे सध्याच्या कामावरून दिसत आहे. त्यामुळे आता सिडकोच्या वतीने आधी जागेचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या जागेवरील 10 गावांपैकी सात गावांनी घरे सोडली आहेत. मात्र तीन गावांमध्ये 60 टक्के लोक अजूनही राहत आहेत. या लोकांनी लवकरात लवकर गावे रिकामी करावीत यासाठी त्यांना 15 डिसेंबरची शेवटची मुदत देण्यात आली आहे. त्याचबरोबर सिडकोने या ठिकाणी गावठाणाबाहेर असणार्या घरांना अनधिकृत ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. मात्र ग्रामस्थांनी स्वतःहून ही गावठाणाबाहेरील घरे सोडण्यास सुरुवात केली. त्यानुसार आतापर्यंत उलव्यातील 25 घरे तोडण्यात आली असून कोंबडभुजे गावातील 20 घरे तोडण्यात आली आहेत. त्याचबरोबर गावठाणाच्या आतील करारपत्र झालेल्या आणि वाटपपत्र मिळालेल्या काही ग्रामस्थांनी आपली घरे तोडण्यास सुरुवात केली आहे.
ग्रामस्थांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या असून उर्वरित मागण्याही मान्य झाल्या की ग्रामस्थांनीही गावे सोडण्याची तयारी दाखवली आहे. त्यासंदर्भात मंगळवारी सिडको कार्यालयात एक बैठक बोलावण्यात आली होती, मात्र सिडकोचे अधिकारी उपलब्ध नसल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली असून त्यासाठी शुक्रवारची वेळ देण्यात आली असल्याची माहिती पुंडलिक म्हात्रे यांनी दिली.
मंगळवारी सिडकोने जागा मोकळी करून घेण्यासाठी अडचण नसणार्या आणि विषय संपलेल्या शाळांच्या इमारती तोडण्यास सुरुवात केली आहे. या शाळांसाठी ग्रामस्थांनी मोठा लढा दिला होता. आंदोलन केले होते. त्यानुसार प्रत्येक गावासाठी एक शाळा देण्यास सिडको तयार झाली आणि पूर्ण ताबा मिळाल्यानंतर आता इमारती पाडल्या जात आहेत.
वर्षअखेरीपर्यंत संपूर्ण जागा घेणार ताब्यात
नवी मुंबई विमानतळासाठी आवश्यक असलेल्या सर्व जमिनीचा ताबा मिळण्यासाठी सिडकोची अजूनही लढाई सुरूच असून आता हा तिढा सोडवण्यासाठी अखेरचे पण कठोर पाऊल टाकले जात आहे. या वर्षाखेरीपर्यंत संपूर्ण जागा ताब्यात यावी असा सिडकोचा प्रयत्न आहे. त्यामुळेच गावठाणाबाहेरील घरांना सिडकोने लक्ष्य केले होते आणि त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर आता गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.