Sunday , February 5 2023
Breaking News

सर्कस चालकाविरोधात गुन्हा दाखल

जखमी प्राण्यांना क्रूर वागणूक

पनवेल ः प्रतिनिधी

सर्कस चालविण्याचा तसेच प्राण्यांना खेळविण्याचा, त्यांना प्रशिक्षण देण्याचा परवाना नसताना ’द ग्रेट भारत सर्कस’चालकाने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी व लोकांच्या मनोरंजनासाठी खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोरील मैदानात सुरू असलेल्या सर्कसमध्ये जखमी प्राण्यांना क्रूर व निर्दयीपणे वागणूक दिल्याचे आढळले. त्यामुळे कामोठे पोलिसांनी पेटा संस्थेच्या तक्रारीवरून ’द ग्रेट भारत सर्कस’चे व्यवस्थापक राधामोहन श्रीधर पिल्ले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सर्कसमध्ये प्राण्यांचा वापर करण्यासंबधी विविध नियम आहेत. प्राण्यांना खेळविण्याचा व त्यांना प्रशिक्षण देण्याचा परवाना घ्यावा लागतो, मात्र ’द ग्रेट भारत सर्कस’ चालकाने सर्कसमध्ये प्राण्यांचा वापर करण्यासंबंधी कुठलीही परवानगी न घेता खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोरील मैदानात 2 नोव्हेंबरपासून ’द ग्रेट भारत सर्कस’ला सुरुवात केली. या सर्कसमध्ये घोडा, खेचर, दोन ऊंट, सात कुत्री व दोन इमूंचा वापर करण्यात आला. सर्कसचालकाने या वेळी जखमी प्राण्यांचा बेकायदा वापर करून त्यांना क्रूर वागणूक देऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पेटा संस्थेने केली होती.

’द अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया’ने या तक्रारीची दखल घेऊन सर्कसमध्ये प्रत्यक्ष जाऊन तपासणी केली. यात सर्कसमधील एका उंटाच्या पायाला, तर दुसर्‍याच्या जबड्याला गंभीर दुखापत आढळली. सर्कसमधील इमूला पुरेसे अन्नपाणी न देता लहान पिंजर्‍यात बंदिस्त ठेवल्याचे आढळून आले. कुत्रे, घोडा, खेचर यांचाही सर्कसमध्ये निर्दयीपणे वापर करण्यात येत असल्याचे समोर आले. याबाबतचा अहवाल ’द अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया’ने दिल्यानंतर पेटा संस्थेने याबाबत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सुनील कुंजू यांनी कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार ’द ग्रेट भारत सर्कस’चे व्यवस्थापक राधामोहन श्रीधर पिल्ले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब तुपे यांनी दिली.

वेगळ्या नावाने सर्कस

द ग्रेट भारत सर्कस चालविणार्‍या राधामोहन पिल्ले यांच्याकडे द ग्रेट गोल्डन सर्कस या नावाने परवाना असताना त्यांनी बेकायदा द ग्रेट भारत सर्कस या नावाने सर्कस सुरू करून दिशाभूल केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळेही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुपे यांनी सांगितले.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply