अलिबाग : प्रतिनिधी
माणकुले- शिरवली रस्त्याचे तसेच पेयजल योजनेचे काम सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी माणकुले परिसारातील ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. 10) जिल्हाधिकरी कार्यालयासमोर जागरण-गोंधळ आंदोलन केले.
अलिबाग तालुक्यातील माणकुले – शिरवली रस्त्याच्या कामाची निविदा 4 जानेवारी 2107 रोजी काढण्यात आली होती. या रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना भेटून चर्चा केली. लेखी निवेदन दिले तरी या रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही.
2 फेब्रुवारी 2018 रोजी एक कोटी 22 लाख रूपयांचा निधी मुख्यमंत्री पेयजल पाणीपुरवठा योजनेतून मानकुळे पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर झाला होता. हे काम 11 ऑगस्ट 2019 पर्यंत पूर्ण करायचे होते. या कामालादेखील सुरूवात झालेली नाही. या बाबत रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात लेखी पत्रव्यवहार केला. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या दोन्ही कामांना सुरूवात करण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी ग्रामस्थांनी जागरण – गोंधळ आंदोलन केले. गु्रप ग्रामपंचायत माणकुलेचे सरपंच सुजीत गावंड, उपसरपंच पल्लवी पाटील, चंद्रकांत पाटील, सुनिल थळे, रविंद्र पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे, रेवसचे सरपंच मच्छींद्र पाटील आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकरी संघटनेचे बाबुभाई जैन यांनी आंदोलकांना मार्गर्शन केले. भाजप अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर, पंचायत समिती सदस्य उदय काठे, परशुराम म्हात्रे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा दिला.