परळी : प्रतिनिधी
मी भाजप सोडते आहे या वावड्या असून, इथं सगळे आम्ही एकत्र काम केलेले लोक आहोत. त्यांच्यावर काय नाराज व्हायचं? असा प्रतिप्रश्नच भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. एवढंच नाही तर मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री असे कधीही म्हटले नव्हते. अकारण या सगळ्या गोष्टी पसरवल्या गेल्या, असेही त्या म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी मध्यंतरीच्या काळात एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर मोठी घोषणा करणार असल्याचे संकेत दिले होते. आता 12 डिसेंबरच्या म्हणजे गुरुवारच्या एक दिवस आधी पंकजा मुंडे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत मी भाजप सोडणार या वावड्या कुणी उठवल्या असा प्रश्न त्यांनी विचारला, तसेच जे काही अंदाज लढविण्यात आले ते मीडियाने लढवले. मी त्याकडे शांतपणे पाहात होते, असेही मुंडे या वेळी म्हणाल्या.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही माजी मंत्री व भाजप नेते पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्याशी मी बोललो असून, ते दोघेही पक्ष सोडणार नाहीत, असे म्हटले आहे.