Breaking News

गोणीत आढळला मुलाचा मृतदेह; पनवेलमध्ये खळबळ, आठवड्यातील दुसरी घटना

पनवेल : वार्ताहर

पनवेल जवळील एनएच 4 बी महामार्गाच्या कडेला कुंडेवहाळ गावच्या हद्दीत एका अज्ञात लहान मुलाचा मृतदेह सोमवारी आढळला आहे. एका गोणीमध्ये भरून तो मृतदेह फेकून देण्यात आला होता. मागील आठवड्यात अशाच प्रकारे एका इसमाचा मृतदेह रेग्झिन बॅगमध्ये भरलेल्या अवस्थेत हरिग्राम गावच्या हद्दीतील गाढी नदीच्या किनार्‍याजवळ आढळला होता. या वाढत्या प्रकारामुळे पनवेल परिसरात भितीयुक्त वातावरण आहे. सोमवारी सकाळी साधारण 9 ते 10 वयोगटातील एका मुलाचा मृतदेह गोणीत भरलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या अंगात हिरव्या रंगाचा टी शर्ट आणि हाफ काळी पॅन्ट घातलेली आहे. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जेएनपीटी रोडच्या बाजूला कुंडेवहाळ गावच्या हद्दीत एक प्लास्टिक गोण बेवारस रित्या पडल्याची दिसून आले. त्यामध्ये लहान मुलाचा मृतदेह असल्याचे पोलीस पाटील दत्तात्रय पाटील यांनी पनवेल शहर पोलिसांना कळवले. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन त्या चिमुकल्या मुलाचा मृतदेह शवविच्छेदन करता पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आणला आहे. हा खुनाचा प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

तसेच मृतदेहाची ओळख पटावी यासाठी त्याचे छायाचित्र आणि वर्णन सर्वत्र पाठवण्यात आले आहे. याशिवाय एखाद्या लहान मुलाची मिसिंग ची कुठे तक्रार आहे. याचीही माहिती परिसरातील पोलीस ठाण्यातून मागवण्यात आली आहे. दरम्यान अशाप्रकारे गोणीमध्ये मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मागील आठवड्यात सुद्धा अशाच प्रकारे एका अज्ञात इसमाचा मृतदेह काळसर रंगाच्या फास्ट ट्रॅक कंपनीच्या बॅगमध्ये घालून तसेच बॅग लाल रंगाच्या ओढणीने बांधून नदी किनार्‍याजवळ टाकून ते पसार झाले होते. एका आठवड्या भरात सलग दोन घटना घडल्याने परिसरात भितीयुक्त वातावरण आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply