पनवेल : वार्ताहर
परतीच्या पावसाने झालेल्या पनवेल तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार अमित सानप यांनी दिली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून हे पंचनामे सुरू करण्यात आले असून आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पंचनामे पूर्ण झाल्यावर शासनाला त्यासंबंधीचा अहवाल पाठविण्यात येईल, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले. पनवेलमध्ये सुद्धा शेतीचे नुकसान झाले असून, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागाने परतीच्या पावसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गेल्या दोन-तीन दिवसांपासून पनवेल तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार अमित सानप यांनी दिली आहे. आठवडाभरात हे पंचनामे पूर्ण होऊन शासनाला त्यासंबंधीचा अहवाल पाठविण्यात येईल. त्यानंतर शासनाच्या आदेशानुसार शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी शेतकर्यांनी संबंधित तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन, तहसीलदार अमित सानप यांनी केले आहे.