Breaking News

भूमी अभिलेख कार्यालयच भाडेतत्त्वावर!

पनवेल : बातमीदार

जमिनीची मोजणी करून कोणत्या जमिनीचा मालक कोण हे ठरविणारे भूमी अभिलेख कार्यालय अद्यापही मालकीच्या जागेत नाही. पनवेलमध्ये 1994मध्ये अस्तित्वात आलेले कार्यालय आजतागायत भाडेतत्त्वावर दिवस काढत असल्यामुळे जागेच्या अडचणी भासत आहेत.

महसूल आणि वनविभागाच्या अंतर्गत येणारा भूमी अभिलेख विभाग जागेच्या नोंदी ठेवून व मागणीनुसार जमिनीची मोजणी करून गटबुक नकाशा तयार करण्याचे काम करतो. पनवेल तालुक्यात होणार्‍या विविध प्रकल्पांमुळे येथील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिडको, नैनाच्या माध्यमातून विकास होत असल्यामुळे जागांची खरेदी-विक्रीदेखील मोठ्या संख्येने केली जाते. यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडून जमिनीच्या मोजणीला महत्त्व असते. गाव नकाशा, आकारफोड पत्रक, आकारबंद, गटस्किम उतारा, प्रॉपर्टी कार्ड बनविणे यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात शेतकरी, व्यावसायिक, विकसकांना जावे लागते.

दोन वर्षांपूर्वी पनवेल शहरात आगरी समाज मंडळाच्या इमारतीत भाड्याने असलेले कार्यालय नवीन पनवेल येथील सिडकोच्या कम्युनिटी सेंटरमध्ये स्थलांतरित करण्यात आले. तळमजल्यावर असलेले हे कार्यालय अपुरे आहे. पनवेल तालुक्यातील महत्त्वाचे नकाशे ठेवण्यासाठी असलेली रूम म्हणजे अभिलेख कक्षदेखील अपुर्‍या जागेत आहे. सध्या सिडकोला 30 हजार रुपये प्रतिमहिना भाडे दिले जाते. आवकजावक लिपिक, भूमापक, निमतानदार क्रमांक 2, नगरभूमापन लिपिक, प्रतिलिपी लिपिक, भूकरमापक कक्ष, दुरुस्ती लिपिक आदी पदांवर काम करणारे अधिकारी अत्यंत कमी जागेत काम करतात. नकाशा उघडून पाहणी करणेदेखील जमत नाही इतक्या लहान जागेत दररोज काम करतात.

अनेक वर्षांपासून आमचे कार्यालय भाड्याच्या इमारतीत आहे. स्वत:च्या मालकीची जागा नसल्यामुळे सिडकोला भाडे भरून काम केले जात आहे. सिडकोच्या नैना भागात आम्हाला जागा मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसा प्रस्ताव मी सिडकोला पाठविणार आहे.

-योगेश्वर सावकार, उपअधीक्षक,  भूमी अभिलेख कार्यालय, पनवेल

अनेक अडचणी, प्रयत्न मात्र नाहीत!

सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे कार्यालय कमी पडत असल्यामुळे सिडकोच्या कम्युनिटी सेंटरच्या आवारात लोखंडी कंटेनर ठेवून यामध्ये काही कर्मचारी काम करीत बसतात. तहसील कार्यालयासह पोलीस ठाणे, कोषागर कार्यालयासाठी प्रशासकीय भवन उभारण्यात आले आहे. या कार्यालयात उपअधीक्षक भूमी अभिलेख, पनवेल यांच्या कार्यालयासाठी जागा असेल अशी अपेक्षा होती, मात्र नव्या इमारतीत त्यांच्या कार्यालयासाठी जागा नसल्यामुळे प्रशासकीय भवन तयार झाले तरी भाड्याच्या खोलीत कार्यालय चालवावे लागणार असल्याचे दिसते. आजवर 24 उपअधीक्षक येऊन काम करून गेले आहेत, मात्र अधीक्षकांनी स्वत:च्या मालकीचे कार्यालय व्हावे यासाठी प्रयत्न केले नाहीत. नुकत्याच झालेल्या पावसाळ्यात उपअधीक्षकांच्या कार्यालयालाच गळती लागल्यामुळे उपअधीक्षकांना कार्यालयाच्या बाहेर लोखंडी कंटेनरमध्ये कार्यालय थाटावे लागले होते.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply