Breaking News

वाळू उत्खननासाठी केटी बंधार्याच्या झडपा काढल्या

कर्जत शिरसे परिसरातील ग्रामस्थ आक्रमक

कर्जत : प्रतिनिधी

पाणी अडविण्यासाठी उल्हास नदीमध्ये कर्जत तालुक्यात ठिकठिकाणी केटी बंधारे बांधण्यात आले आहेत. शिरसे ग्राम पंचायत हद्दीतील नदी पात्रात असलेल्या केटी बंधार्‍यात पावसाळा संपताच वाहून जाणारे पाणी रोखण्यासाठी लोखंडी झडपा टाकण्यात आल्या होत्या. मात्र बेकायदा वाळू उत्खनन करणार्‍यांनी त्या रातोरात काढून बाजूलाच असलेल्या मोकळ्या परिसरात फेकून दिल्या आहेत. यामुळे या बंधार्‍यातील पाणी वाहून गेल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागेल, या विचाराने ग्रामस्थ संतप्त झाले असून, त्यांनी याबाबत सर्व संबंधित शासकीय विभागाकडे पत्र व्यवहार करून पुन्हा झडपा बसविण्याची मागणी केली आहे. कर्जत तालुक्यातील शिरसे ग्रामपंचायत हद्दीत दोन सिमेंटचे पक्के बंधारे बांधण्यात आलेले आहेत. त्यांची निगा, दुरुस्ती व पाणी साठवणुकीसाठी लघु पाटबंधारेच्या उप विभागाने सदर बंधारे ग्रामपंचायतीकडे वर्ग केले आहेत. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीमार्फत दर वर्षी पावसाळ्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान पाण्याचा प्रवाह सुरू असताना बंधार्‍याला लोखंडी झडपा (गेट) बसविण्यात येतात. यावर्षीही त्या झडपा बसविल्या होत्या. दरम्यान या परिसरात काही जण गैरमार्गाने वाळू काढतात. साचलेल्या पाण्यामुळे त्यांना वाळू काढणे शक्य होत नाही. त्यामुळे अनधिकृत वाळू उत्खनन करणार्‍यांनी रात्री गुपचूप या बंधार्‍याच्या लोखंडी झडपा काढून टाकल्या, असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे असून याबाबत त्यांनी पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय, लघु पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. दरम्यान, पाणी गुणवत्ता व स्वच्छता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे केलेल्या जलस्रोत तपासणीत शिरसे गावचे पाणी पिण्यास अयोग्य आहे असे निदान झाले होते. त्यामुळे ग्रामस्थांना या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे पाणी पिण्यासाठी वापरतांना फारच काळजी घ्यावी लागत आहे. यावर उपाय म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारावे अशीही मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

ग्रामीण पाणी पुरवठा योजने अंतर्गत पुरविण्यात येणारे पाणी ग्रामस्थांना पुरेसे मिळत नाही. त्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात त्याचप्रमाणे गावातील गरजू शेतकर्‍यांना शेतीसाठी पाणी आवश्यक असल्याने पाणी व्यवस्थापन करण्याचे उपाय योजना कराव्यात.

-महेश देशमुख, ग्रामस्थ, शिरसे, ता. कर्जत

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply