अकोला, नगर ः प्रतिनिधी
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी तर गारपिटीसह वरुणराजाने हजेरी लावली. यामुळे रब्बी पिकांना धोका निर्माण झाला असून शेतकर्यांची चिंता वाढली आहे. विदर्भातील अकोल्यात मंगळवारी (दि. 28) दुपारी 2च्या सुमारास गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. अकोल्यासह भंडारा, यवतमाळ, वाशिममध्ये पावसाने हजेरी लावली. गारपीट आणि पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांच्या हरभरा, गहू आणि तूर पिकांचे नुकसान झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातही गारांचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला. श्रीरामपूर, नेवासा तालुक्यात जोरदार गारपीट झाली. नगरमधील या पावसाचा द्राक्ष, कांदा व अन्य पिकांना फटका बसला आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्यातील औरंगाबादमध्येही गारपीट आणि जोराचा पाऊस झाला. गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव तालुक्यात ज्वारीसह इतर पिकांना झळ बसली आहे.
-भंडार्यात वीज पडून मुलाचा मृत्यू
भंडारा ः वीज कोसळल्याने धुसाळा शेतशिवारात मंगळवारी (दि. 28) दुपारी 12 वर्षीय मुलास जीव गमवावा लागला आहे. नयन परमेश्वर पुंडे असे मृत मुलाचे नाव असून तो आजोबांसोबत म्हशी चराईसाठी गेला होता.