
खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे महामार्गावरील नढाळ हद्दीतील एका गोडाऊनला गुरूवारी (दि. 19) आग लागून त्यात करोडो रुपयांचा माल खाक झाला आहे. लोधिवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील नढाळ गावच्या अंतर्गत व मुंबई -पुणे महामार्गावर आरएमडी क्विकफॉर्म प्रा. ली. कंपनी असून यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बांधकामाला लागणारे सेंटरिंग साहित्याची निर्मिती होते, असे समजते. या ठिकाणी उत्पादन घेण्यात येते की, मालाची साठवणूक करण्यात येते याबाबत निश्चीत माहिती नसली तरी ही जागा वाणिज्य कारणासाठी बिनशेती झाल्याचे खात्रीपूर्वक समजते.या कंपनीच्या गोडाऊनला गुरूवारी सकाळी आग लागली. पातळगंगा एमआयडीसी, सिडको, टाटा स्टील, रिलायन्स कंपनी व खोपोली नगरपालिका यांच्या अग्निशमन दलाने ही आग मोठया शर्तीने विझवली आहे. शॉर्टसर्किट ने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अद्यापही पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही, असे चौक पोलीस ठाण्यातून कळते.