Breaking News

बेलवेडीयर पॉइंट पर्यटकांसाठी सुरक्षित

माथेरान वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून बसवले सुरक्षा कठडे

कर्जत : बातमीदार

माथेरान वन व्यवस्थापन समितीने येथील बेलवेडीयर पॉईंटवर सुरक्षा कठडे बसविले आहेत. त्यामुळे हा पॉईंट पर्यटकांसाठी सुरक्षित झाला आहे. पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये विविध पॉईंट असून त्यापैकी सात पॉईंट सर्कल हे महत्वाचे मानले जातात. येथे येणारा प्रत्येक पर्यटक हे सात पॉईंट सर्कल फिरूनच जातो. त्यातील लिटिल चौक, वन ट्री हिल आणि बेलवेडीयर हे महत्वाचे पॉईंट आहेत. त्यापैकी बेलवेडीयर पॉईंटवरून मोरबे धरण, शिवाजी महाराजांचा प्रबळ गड, इर्शाळ गड, रसायनी, पनवेल हा भाग अतिशय सुंदर दिसतो. त्यामुळे या पॉईंटला विशेष महत्व आहे. मात्र सुरक्षा कठडे नसल्यामुळे पर्यटकाना बेलवेडीयर पॉईंट धोकादायक वाटत होता. चार महिन्यांपुर्वी या पॉईंटवर एक महिला पर्यटकाच्या पायाला ठेच लागून अपघात झाला होता. त्याची दखल घेऊन, माथेरान वन व्यवस्थापन समितीने या पॉईंटवर सुरक्षा कठडे बांधण्याचे ठरविले. त्यासाठी ही समिती व वन विभागाला माथेरान सनियंत्रण समितीची परवानगी घ्यावी लागली. ही परवानगी मिळताच वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश जाधव व वन क्षेत्रपाल नारायण राठोड यांनी वन व्यवस्थापन समितीच्या अखत्यारीत असलेल्या पार्किंगमधून येणार्‍या उत्पन्नातून साडेतीन लाख खर्च करून 35 फुट लांबीचे लोखंडी सुरक्षा कठडे बांधले आहेत. त्यामुळे बेलवेडीयर पॉईंटवर पुन्हा पर्यटकांची वर्दळ सुरू झाली आहे.

बेलवेडीयर पॉईंटवर कठडे नसल्यामुळे पर्यटक कमी प्रमाणात जात होते. त्या पॉईंटकडे जाण्यासाठी जांभा दगडाचा रस्ता असून या रस्त्यावर मोठी झुडपे उगवली होती. पण सुरक्षा कठडे होताच या रस्त्यावरील झुडपे हटवून हा रस्ता चालण्यायोग्य केला आहे. आता पर्यटक या पॉइंटचा सुरक्षित आनंद घेऊ शकतात.

-योगेश जाधव, अध्यक्ष, वन व्यवस्थापन समिती, माथेरान

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply