Breaking News

एक्स्प्रेस वेवरून कोसळला रसायनाने भरलेला टँकर, ट्रान्सफार्मर फुटला; तीन तास वाहतूक ठप्प

खोपोली ़: प्रतिनिधी

एक्स्प्रेस वेवरून पुण्याकडून मुंबईकडे येणारा रसायन भरलेला टँकर गुरुवारी (दि. 19) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खोपोलीजवळील पुलावरून खाली आडोशी-ताकई रस्त्यावर कोसळला. सदर टँकर विद्युत ट्रान्सफरला धडक देऊन कोसळल्याने मोठा आवाज होऊन ट्रान्सफार्मर फुटला व टँकरला आग लागली. यानंतर आडोशी रस्त्यावर आगीचे मोठमोठे लोट निघायला सुरुवात झाली. या घटनेमुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुमारे तीन तास ठप्प झाली होती. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

स्थानिक रहिवासी व नजीकच्या कंपनीतील अधिकार्‍यांनी सदर घटनेची माहिती स्थानिक आपत्कालीन ग्रुप, खोपोली पोलीस, अग्निशमन दल तसेच एक्स्प्रेस वेवरील आपत्कालीन यंत्रणांना दिली. यादरम्यान आगीने उग्र रूप धारण केले होते. टँकरमधील रसायन टँकरबाहेर येऊन आग भडकायला सुरुवात झाली होती. विचित्र वासाने आजूबाजूच्या नागरिकांना व मदत करणा़र्‍यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. अर्ध्या तासात महामार्गावरील आपत्कालीन यंत्रणा, खोपोली अग्निशमन दल व खोपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  स्थिती गंभीर असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ पाताळगंगा एमआयडीसी, एचओसी, रिलायन्स, टाटा भूषण स्टील, स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन यंत्रणांना पाचारण केले. लोणावळा येथील नेव्ही कॅम्पमधील आयन-शिवाजीची तांत्रिक टीमही वरिष्ठ अधिकारी एस. जी. साठे यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी दाखल झाली. तीन  तासांच्या संयुक्त व अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. संपूर्ण आग आटोक्यात आल्यानंतर एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरू करण्यात आली.

घटनेची सर्व तांत्रिक तपासणी, रसायन प्रकार व प्रदूषणामुळे स्थानिक स्तरावरील संभाव्य धोका या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी खोपोली पोलीस, आयन शिवाजी, महामार्ग आपत्कालीन पथक, प्रदूषण नियंत्रण अधिकारी यांची संयुक्त टीम बनविण्यात आली असून, ही टीम नमुने तपासून 24 तासांत तपासणी अहवाल देणार आहे.

या अपघातात रसायन भरलेल्या टँकरने धडक दिल्याने विद्युत ट्रान्स्फार्मर फुटला. त्यामुळे आडोशी-ढेकू परिसरातील  वीजपुरवठा पूर्णपणे बंद झाला. महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवण्यात आली असून वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी सात ते आठ तास लागण्याची शक्यता आहे.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply