Monday , February 6 2023

मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या; पाण्यासाठी वेळेत उपाययोजना करा, आमदार महेश बालदी यांची विधानसभेत जोरदार मागणी

पनवेल ः प्रतिनिधी

शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या मदतीप्रमाणे उरण भागातील मच्छीमार बांधवांना नुकसानभरपाई द्यावी, त्याचबरोबर धरण व एमआयडीसीच्या माध्यमातून नागरिकांना पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी उरणचे आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी (दि. 19) नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी

अधिवेशनात केली.

पुरवणी मागणीवर चर्चा करताना सभागृहात आमदार महेश बालदी म्हणाले की, आशिया खंडात सर्वांत जास्त मासेमारी उरण भागात होते. उरण विभागात शेतीपेक्षा मत्स्यव्यवसाय केला जातो. नैसर्गिक चक्रामुळे मच्छीमारीवर संक्रात आली आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांप्रमाणे मच्छीमारांनाही नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित आहे.

प्रतिहेक्टरी 25 हजार रुपये शेतकर्‍यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे  मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येऊ देऊ नये त्याकरिता शासनाने मत्स्यविभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण करून मच्छीमारांना अर्थात मत्स्यव्यवसायाला आर्थिक मदत करावी, तसेच मच्छीमारांना डिझेल परतावा वेळेवर द्यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.

उरण मतदारसंघात पनवेल ग्रामीणचाही भाग येतो. या परिसरात होणारे वाढते नागरीकरण लक्षात घेता दररोज पाण्याची समस्या वाढत आहे. रसायनी व पाताळगंगा परिसरात धरणे आहेत. या धरणांतून परिसरातील लोकांना पिण्याचे मुबलक पाणी मिळू शकते. फक्त त्यासाठी जलशुद्धिकरण केंद्र कार्यान्वित करण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने रसायनी भागात असलेल्या उसराई व जांभिवली धरणांना पाणी शुद्धिकरण केंद्र कार्यान्वित करावेत, अशीही मागणी या वेळी त्यांनी केली. एमआयडीसीकडून पाणी मिळण्यासाठी लोक पैसे भरायला तयार आहेत, मात्र गेल्या 10-15 वर्षांपूर्वीच्या थकबाकीचे कारण देऊन एमआयडीसी ग्रामपंचायतींना पाणी देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे गावांना पाणी मिळण्याच्या दृष्टिकोनातून यासंदर्भात एमआयडीसी व ग्रामपंचायतीत योग्य समन्वय होण्यासाठी शासनाने पॉलिसी तयार करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

आमदार म्हणून प्रथमच विधिमंडळात बोलताना आमदार महेश बालदी यांनी आपल्या मतदारसंघातील प्रश्नांना अधोरेखित केले. या सर्व समस्यांवर योग्य आणि वेळेवर उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे उरण मतदारसंघाला आमदार महेश बालदी यांच्या रूपाने जनहिताचे कार्य करणारा कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी मिळाल्याचे प्रकर्षाने जाणवते.

उरण विधानसभा मतदारसंघातील समस्या सोडविण्याबरोबरच मतदारसंघाचा जास्तीत जास्त विकास करणे हा आपला मूळ उद्देश आहे. मतदारसंघातील तमाम जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. त्यानुसार मतदारसंघातील ज्वलंत प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यरत राहणार आहे.             – महेश बालदी, आमदार, उरण विधानसभा

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply