कडाव ः वार्ताहर
कर्जतमधील कडाव येथील ओम साई मित्रमंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे श्री. बाळदिगंबर गणेश मंदिर येथून यावर्षीही कडाव-शिर्डी अशा पायी पदयात्रा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन साईबाबांच्या पालखीचे कडावमधून शिर्डीकडे प्रस्थान झाले. याप्रसंगी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
शनिवारी (दि. 21) कडावमधील श्री. बाळदिगंबर मंदिरातून सकाळी नऊ वाजता साईंची पालखी शिर्डीकडे हरिनामाच्या जयघोषात काढण्यात आली. याप्रसंगी ग्रामस्थ आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. 21 ते 27 डिसेंबरपर्यंत चालणार्या या पालखी सोहळ्यात पहाटेची आरती, मध्यान्ह आरती, साईबाबांचा गजर, धूपारती हे धार्मिक विधी होणार आहेत. पदयात्रेतील साईभक्तांसाठी मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करण्यात आली असून या सात दिवसांत साईंची पालखी म्हसा, वैशाखरे, करंजाळे, पिंपरी पेंढार, कर्जुलेपठार, निळवंडे येथील मुक्कामानंतर पालखीचे श्रीक्षेत्र शिर्डी येथे आगमन होणार आहे.