नवीन पनवेल मधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर शुक्रवारी मोठ्या प्रामाणात ज्येष्ठ नागरिक जमले होते. कोणी तात्पुरत्या तयार करण्यात आलेल्या मंचाची व्यवस्था तर कोणी साऊंड सिस्टिम चेक करीत होता. साहेबराव जाधव पुष्पगुच्छ, नाष्ट्याची व्यवस्था झाली आहे की नाही याची खात्री करीत होते. अध्यक्ष प्रकाश विचारे पुन्हा पुन्हा सगळे बरोबर आहे की नाही याची खात्री करीत होते नाना रेडकर आणि सुरेन्द्र पाटील यांची ही लगबग सुरू होती. या ठिकाणी कोणता तरी खास कार्यक्रम असावा याची खात्री पटत होती. कार्यक्रमाची वेळ जवळ आली होती. कार्यक्रमाच्या पाहुण्या विसपुते एज्युकेशन कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सिमा कांबळे-साडलेकर ही त्याठिकाणी आल्या. पण कार्यक्रम काय आहे याची त्यांना ही कल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांची ही उत्सुकता वाढली होती.
संध्याकाळचे सात वाजले अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी माईक हातात घेतला आणि बोलायला सुरुवात केली. आज आपण सगळे या ठिकाणी जमलो आहोत त्या कार्यक्रमाच्या उत्सवमूर्ती प्राचार्या डॉ. मॅडम आहेत खरे पाहिले तर या कट्ट्यावर आपण ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांचे वाढदिवस साजरे करतो. पण आज आपण आपल्या सदस्य नसलेल्या आणि वयाने ही ज्येष्ठ नसलेल्या डॉ. सिमा कांबळे-साडलेकर यांनी केलेल्या कार्याची दखल घेणे आवश्यक असल्याने त्यांचा वाढदिवस येथे साजरा करणार आहोत असे सांगताच अनेक ज्येष्ठ नागरिकांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. त्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना सीमा मॅडमचे आलेले अनुभव सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या आणि केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
कोल्हापूरमधील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या सिमा निवृत्ती कांबळे यांचे शिक्षण ही तेथेच झाले. एम.एड. झाल्यावर औरंगाबादमधून डॉक्टरेट मिळवली. त्यानंतर मुंबईत करियर करण्याचे ठरवले. शासनाने घाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केले. त्यावेळी सिमा कांबळे यांनी स्वच्छतेवर प्रबंध लिहिला. त्या म्हणतात हे अभियान म्हणजे महात्मा गांधीजींची ‘नई तालीम’ आहे. नवीन पनवेलच्या विसपुते महाविद्यालयात आल्यावर खर्या अर्थाने त्यांनी स्वच्छतेचे काम सुरू केले. पनवेल जवळील बापदेववाडी येथे आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन जाऊन वाडीमध्ये स्वच्छता केली. वाडीचे रूपच बदलून गेले. आपल्या महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्याकडे ही त्यांचा कटाक्ष असतो. त्यासाठी सहकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमधून त्यांनी स्वच्छतेचे दूत नेमले आहेत. मानवी अस्तित्वासाठी अनिवार्य घटक असलेला ऑक्सीजन म्हणजेच प्राणवायू देणार्या वनस्पतीमध्ये सगळ्यात महत्वाची असलेल्या तूळशीची झाडे असलेल्या तुळशीचे उद्यान महाविद्यालयाच्या आवारात विकसित करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. आजूबाजूच्या सोसायटीत ही तुळशीचे उद्यान विकसित करण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. त्यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयात ज्ञान पेटी सुरू करण्यात आली आहे. या ज्ञान पेटीत गरीब, झोपडीपट्टीत राहणार्या किंवा अनाथ मुलांसाठी त्यांना शिकण्यासाठी आवश्यक असलेल्या वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल किंवा खोडरबर या सारख्या वस्तू ही मिळत नाहीत पण त्यांना शिक्षणाची आवड आहे. शिकून काही तरी बनण्याची जिद्द आहे अशा मुलांना ज्ञान घेण्यासाठी मदत व्हावी यासाठी ज्ञान दान म्हणून या वस्तू या ज्ञान पेटीत टाकाव्यात अशी त्यांची संकल्पना आहे तिला चांगलाच प्रतिसाद मिळाला.
त्यांच्या मते आजची शिक्षण पध्दती चांगली आहे पण विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होऊन ते परिपूर्ण व्हायला हवेत. आज मुलांना तडजोड करणे आणि ताण-तणाव सहन करणे अवघड जाते. यासाठी शिक्षकांनी आई होऊन शिकवताना नवीन पद्धत अनुसरून सतत अपडेट राहून विद्यार्थ्यांना प्रवाहात आणले पाहिजे. त्यांनी आपल्या महाविद्यालयात पालकत्व संकल्पना राबवली आहे. एका प्राध्यापकाकडे दोन गैरहजर राहणार्या किंवा अभ्यासात मागे असलेल्या मुलांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामूळे अशा मुलांची प्रगती दिसून येत असल्याचे त्या सांगतात. ज्ञानदान हे सर्व श्रेष्ठ दान समजले जाते, हे ज्ञान गुरूकडून मिळते. त्यामुळे त्याकडे सर्व सामान्य माणूस दुर्लक्ष करतो. पण त्यासाठी गुरू होणेच गरजेचे आहे असे नाही तर आपण ही हे दान ज्ञान पेटीमुळे करू शकतो याची जाणीव त्यांनी समाजाला करून दिली आहे म्हणून त्यांच्या कार्याची दखल समाजाने घेणे गरजेचे असल्याने हा वाढदिवस याठिकाणी साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांनी साजरा केलेला हा वाढदिवस आपण आयुष्यात विसरू शकणार नाही असे यावेळी भारावून गेलेल्या सीमा मॅडम यांनी सांगितले.
-नितीन देशमुख, फेरफटका