Breaking News

सुधागडातील हातोंड पंचक्रोषीत भीषण वणवा; लाखोंचे नुकसान, वृक्षसंपदा जळून भस्मसात

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यात हातोंड पंचक्रोशीत अग्नीप्रलय झाला असून 48 तासांहूनही अधिक काळ अग्नी तांडव सुरूच होता. दोन दिवस सुरू असलेला हा अग्नी तांडव शनिवार (दि. 27) पर्यंत सुरूच होता. या अग्नी प्रलयात सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नसली तरी हजारो झाडे जळून खाक झाली आहेत. नलावडे फार्ममधील 20 ते 25 वर्षांपूर्वी लावलेली हजारो फळझाडे जळून गेली आहेत. साधारणपणे 15 ते 20 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज नलावडे फार्मचे मालक संतोष नलावडे यांनी बोलताना व्यक्त केला आहे. या वेळी ते म्हणाले की, ही आग लागण्यामागे घातपात असण्याचा संशय आहे. कारण ही आग नलावडे फार्मच्या अगदी जवळपास लागली आहे. नलावडे फार्मचे नुकसान व्हावे म्हणूनच कुणीतरी जाणीवपूर्वक ही आग लावली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ही आग विझविण्यासाठी ग्रामस्थ रात्रंदिवस प्रयत्न करीत होते. मात्र वेगवान वणव्यामुळे आग विझविणे अशक्य होत होते. अनेक ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. आपत्ती व्यवस्थापनाचा डांगोरा पिटणारे प्रशासन मात्र या दोन तीन दिवसांत कुठेही दिसले नाही. सातत्याने वणवे लागल्याच्या घटना समोर येत आहेत, वणवा लागतो की लावला जातोय हे शोधणे गरजेचे आहे. वनविभाग यावर कोणती उपाययोजना करेल की नाही, असा सवालदेखील पर्यावरण प्रेमी व जन मानसातून विचारला जातोय.

सुधागड तालुक्यातील जंगलभाग, रान माळ, डोंगर पठारावर दैनंदिन वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. हातोंड येथील वणवा भीषण होता. वणवे कसे लागतात याबाबत कोणतीही स्पष्टता समोर येत नसल्याने चिंता व्यक्त होतेय. या वणव्याच्या अग्नि ज्वालांनी नैसर्गिक वनसंपदा आणि जैविधता नष्ट होताना दिसत आहे. संबंधित प्रशासनाने वाढते वणवे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.

– मंगेश वाघमारे, अध्यक्ष, सम्यक क्रांती विचारमंच

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply