कोल्हापुरातील महाडिक बंधूंच्या हाती ‘कमळ’
कोल्हापूर : प्रतिनिधी
शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला होता, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जीवावर राज्यात सत्ता आणेल, असा शब्द त्यांनी बाळासाहेबांना दिला होता का? असा शब्द बाळासाहेबांना दिला असता, तर त्यांनी तो खपवून घेतला नसता, असे सांगतानाच मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचे बंधू सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 23) भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी कर्जमाफीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकर्यांसाठी केलेली कर्जमाफी ही केवळ औपचारिकता असून या कर्जमाफीने शेतकर्यांचा काहीही फायदा होणार नाही. ज्यांना गरज आहे, त्यांना तर या कर्जमाफीचा अजिबात फायदा होणार नाही, असे सांगतानाच आघाडी सरकारने शेतकर्यांचा विश्वासघात केला आहे, असा घणाघात फडणवीस यांनी केला.
या सरकारमध्ये सहभागी राजकीय पक्षांनी शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, पण सत्तेवर आल्यानंतर मात्र सरकारने केवळ पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला असून, सरसकट कर्जमाफीच्या मुद्द्याला पाने पुसली आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकर्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये भरपाई देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. ही आश्वासने ठाकरे सरकारने पूर्ण करावीत, असेही फडणवीस म्हणाले.
या वेळी फडणवीस यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात कोणत्याच नागरिकाची नागरिकता परत घेण्याची तरतूद नाही. हा नागरिकत्व देणारा कायदा आहे, नागरिकत्व काढून घेणारा कायदा नव्हे, असे स्पष्ट केले, तसेच या कायद्यावरून अफवा पसरविल्या जात असल्याने त्यापासून सावध राहण्याचे आवाहनही केले.