कर्जत ः प्रतिनिधी
किरवली येथील कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी परंपरेनुसार डोलकाठीच्या टोकाला ढाक डोंगरावरील चढण्या-उतरण्यास अत्यंत कठीण असलेल्या भैरी मंदिरातून तेथील पुजारी मनोहर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ग्रामदेवी बहिरी तळई संस्थान, किरवलीचे सचिव दिलीप बडेकर, उपसरपंच बिपीन बडेकर, जीवन बडेकर, जनार्दन बडेकर, ज्ञानेश्वर जाधव, राजू बडेकर, प्रदीप मोरे, गणेश ठोंबरे, नरेंद्र शेलार, अशोक बांगर, शिरीष क्षीरसागर, सागर वजगे, हितेश काठवले, किरण गायकवाड, तेजस बडेकर, अविनाश खंडागळे, निखिल पन्हाळे, अंकित गायकर आदी ग्रामस्थ गरूड ध्वज आणण्यासाठी ढाक डोंगरावर गेले. ढाक भैरी मंदिरात गरूड ध्वजाची पूजा पुजारी मनोहर कदम यांच्या हस्ते करून हे सारे भाविक भक्त मार्गस्थ झाले. हा गरूड ध्वज देऊळवाडी येथे आणण्यात आला. या ध्वजाची पूजा ट्रस्टचे अध्यक्ष किसन बडेकर यांच्या हस्ते करून हा ध्वज ढोलकाठीच्या तुर्यावर बांधण्यात येणार आहे. त्यानंतर 11 नोव्हेंबर रोजी ही डोलकाठी मंदिराजवळ उभी करण्यात येणार आहे. 12 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेला या डोलकाठीचा मोर पिसार्याने शिवमंदिरातील शिवपिंडीला आरतीच्या वेळी वारा घालून ही 30 फूट उंचीची डोलकाठी हनुवटीवर, दातांवर, कपाळावर व हातावर ठेवून नाचविण्यात येते. हे दृश्य फारच रोमांचकारी असते. त्यानंतर सर्व धार्मिक विधी व कार्यक्रम कार्तिकी पौर्णिमेला संपन्न होतात.