Tuesday , February 7 2023

हे शोषण थांबायलाच हवे

समाजाच्या खालच्या स्तरातून आलेले, कुठलेही प्रशिक्षण नसलेले कामगार सफाईचे हे काम करतात. त्यांना हे काम करताना कुठल्याही स्वरुपाची सुरक्षितता पुरविली जात नाही. तसेच या कामामुळे होणार्‍या आरोग्य समस्यांसाठीही कुठल्याही स्वरुपाच्या सुविधा पुरवल्या जात नाहीत. सरकारी वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यंत्रणांकडून या संदर्भात कठोर कारवाई झाल्याखेरीज या गैरप्रकारांना आळा बसणार नाही हे वारंवार बजावून झाले असूनही यासंदर्भातील परिस्थितीत फरक पडलेला नाही.

साफसफाई करण्यासाठी सेप्टिक टँकमध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी गोवंडीच्या गणेशवाडी परिसरात घडली. आत्यंतिक खेदजनक बाब म्हणजे अशातर्‍हेची आपल्याकडची ही विरळा घटनाही नव्हे. एकट्या मुंबईमध्ये गेल्या पाच वर्षांत मॅनहोल किंवा गटारात साफसफाई करताना 743 दुर्घटना घडल्याची नोंद आहे. अशा स्वरुपाच्या दुर्घटनांमध्ये आजवर सुमारे 365 कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा आकडा निश्चितच अत्यंत धक्कादायक व संतापजनक आहे. नाल्याच्या वा गटारांच्या साफसफाईसाठी कामगार आयुक्तालयाने नियमावली आखून दिली आहे. परंतु ही नियमावली निव्वळ कागदावरच असून तिचे कितपत पालन केले जात असावे असा प्रश्न सफाई कामगारांचा बळी घेणार्‍या या ताज्या घटनेनंतर पडतो. गोवंडी पोलिस ठाण्याच्या बाजूला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत बांधण्यात आलेल्या मोरया को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये ही घटना घडली. तिथे असलेली गटारे तसेच सेप्टिक टँक साफ करण्याचे काम सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी या खासगी कामगारांना दिले होते. कामगार आयुक्तालयाने आखून दिलेल्या नियमावलीचे तिथे पालन झालेले नाही हे उघड आहे. ही घटना म्हणजे सोसायटी आणि ठेकेदाराचा हलगर्जीपणा असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याची गरज असल्याचे आता बोलले जाते आहे. हा असा हलगर्जीपणा का घडत असावा याकडे या निमित्ताने लक्ष देण्याची गरज आहे. मुंबई परिसरात अलीकडच्या काळात अशा अन्य घटनाही घडल्या आहेत. मे महिन्यात ठाण्यात हाऊसिंग सोसायटीतील सेप्टिक टँकच्या सफाईत तिघा कामगारांचा बळी गेला तर गेल्या वर्षी डोंबिवलीमध्ये एका मॅनहोलमध्ये तिघे कामगार मृत्यूमुखी पडले. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या एका अहवालात भारत, बांगलादेश व तत्सम परिस्थिती असलेल्या देशांमधील सफाई कामगारांच्या परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. विशेषत: माणसांचे मलमूत्र असलेल्या सेप्टिक टँकमध्ये उतरून काम करणार्‍या कामगारांची स्थिती सगळ्यात भीषण आहे. ज्या ठिकाणी कुणी अवघे काही सेकंदही उभे राहू शकणार नाही अशा ठिकाणी राबण्यात या कामगारांची हयात जाते. अर्थातच, तिथली दुर्गंधी अंगवळणी पडावी याकरिता तरुण वयापासूनच त्यांना दारूच्या नशेच्या आधार घ्यावा लागतो. भारतासारख्या देशांत या कामांसाठी विशिष्ट जातीच्या असंघटित कामगारांची निवड केली जाते. मानवी विष्ठा वाहून नेण्यास कायद्याने बंदी असली तरी व न्यायालयाने यासंदर्भात कठोर आदेश दिलेले असतानाही या कामासाठी अद्यापही मशीनचा वापर फारसा होताना आढळत नाही. ताज्या घटनेनंतर संबंधित हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी व कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली जाते आहे. अत्यल्प अशा मोबदल्याकरिता हे असंघटित कामगार आपल्या जिवाची जोखीम पत्करतात. हे शोषण थांबायलाच हवे आहे व त्याकरिता संबंधितांवर कठोर कारवाईला पर्याय नाही.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply