पनवेल : रामप्रहर वृत्त
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न व पाठपुरावा सुरू आहे. त्या अनुषंगाने शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. 24) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची मुंबईत भेट घेऊन चर्चा केली आणि कर्नाळा बँकेने ठेवीदारांना पैसे परत करावेत यासाठी आरबीआयने कर्नाळा बँकेला निर्देश द्यावेत, अशी आग्रही
मागणी केली.
या शिष्टमंडळात प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या, खासदार गोपाळ शेट्टी, राज्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकर, ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी, आमदार अमित साटम, कुंडलिक काटकर यांचा समावेश होता.
कर्नाळा नागरी सहकारी बँक पैसे देण्यास असमर्थ ठरल्याने ठेवीदार, खातेदार चिंतेत आहेत. त्यांना त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी ठेवीदार संघर्ष समिती सक्रियपणे कार्यरत आहे, मात्र कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळ झोपेचे सोंग घेऊन बिनधास्त उत्तरांची टोलवाटोलवी करीत आहेत. शेकडो ठेवीदारांनी आपल्या आयुष्याची पुंजी कर्नाळा बँकेत गुंतवली. त्यामुळे ठेवीदारांना आपल्या कुटुंबाच्या भविष्याची चिंता वाटू लागली आहे, तर दुसरीकडे अनेक क्लुप्त्या करून ठेवीदारांना वारंवार फसविण्याचे काम बँक करीत आहे.
स्थानिक बँक म्हणून गोरगरिबांनी जागा-जमीन विकून आपल्या कष्टाची आयुष्याची कमाई कर्नाळा बँकेत जमा केली. परतावा म्हणून त्यांचे पैसे वेळेवर देणे क्रमप्राप्त होते, मात्र बॅँकेतीलच मंडळींनी घोटाळा करून सर्वसामान्य माणसांचा पैसा हडप केला. त्यामुळे अत्यंत बिकट व संकटकालीन अशी परिस्थिती ग्राहकांची झाली आहे. 10 लाख रुपये बँकेत असणार्या ठेवीदारांना 10 खाती उघडण्याचे सांगत प्रत्येक खात्यावर एक लाख रुपये देण्याचे वेळकाढू आश्वासन दिले जात आहे. नुसते पोकळ आश्वासन देण्यापेक्षा दिलेल्या मुदतीत बँकेने ठेवीदारांचे पैसे येत्या 15 दिवसांत परत करावेत यासाठी आरबीआयने त्यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी या वेळी शिष्टमंडळाने केली.