कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार
कर्जत शहरातील डेक्कन जिमखाना भागातील एका इमारतीमध्ये 24 वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून व रॉडच्या साहाय्याने मारहाण करून निर्घृण खून करण्यात आला. हा खून आपापसातील वादातून झाला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. या घटनेने रेल्वेपट्ट्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील रेल्वेपट्ट्यातील वांजळे गावात राहणारा समीर महेंद्र ठाकरे (वय 24) आणि पुलाची वाडी येथे राहणारा चेतन संभाजी भोईर (वय 21) या दोघांमध्ये मंगळवारी रात्री 7च्या सुमारास मधू मालती इमारतीच्या एका ब्लॉकमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. या वेळी चेतनने समीरवर चाकूने वार केले तसेच वाटण वाटण्याच्या लोखंडी रॉडने त्याला मारहाण केली. या मारहाणीत समीरचा मृत्यू झाला.
याबाबतची माहिती समीरचा भाऊ परेश ठाकरे याने बुधवारी सकाळी कर्जत पोलीस ठाण्यात दिली व त्यानुसार रीतसर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …