नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात लवकरच मिथेनॉलमिश्रित इंधन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे जोरदार प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. इंधन आयातीवरील खर्चामध्ये लक्षणीय कपात व वाहनांमुळे होणार्या प्रदूषणात घट हा दुहेरी लाभ यातून साध्य होईल, असा सरकारला विश्वास आहे. या अनुषंगाने देशभरातील पेट्रोलपंपांवर मिथेनॉल उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलियम मंत्रालयास पत्राद्वारे केली आहे.
इंधन आयातीवर भारताला दरवर्षी तब्बल पाच लाख कोटी रुपये खर्च येतो. या खर्चात कपात करण्यासाठी अपारंपरिक इंधन पर्याय वापरण्यास सुरुवात करण्याचे धोरण केंद्र सरकारने आखले आहे.
मिथेनॉलमिश्रित इंधनाचा वापर सुरू करण्यासाठी अनेक परवानग्या आवश्यक आहेत. त्यासंदर्भात नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने नियामक आराखडा मंजूर केला आहे. या मंत्रालयाने मिथेनॉलमिश्रित पेट्रोलसाठीच्या मिश्रणांच्या नियामक मानकांबाबत अधिसूचनाही काढली आहे, अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकार्याने दिली. यापुढील टप्पा पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारित येत असून, त्यासाठी गडकरी यांनी पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून देशभरातील पेट्रोल पंपांवर मिथेनॉल उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना केली आहे. या इंधनासाठी गाडीत बदल करण्याची गरज नाही.
इथेनॉलपेक्षा स्वस्त
अपारंपरिक इंधन वापराच्या पहिल्या टप्प्यात प्रथम इथेनॉलला प्राधान्य देण्याचे ठरले होते, परंतु इथेनॉलच्या उत्पादनाचा खर्च प्रतिलिटर 42 रुपये आहे. मिथेनॉल मात्र
यापेक्षा कितीतरी स्वस्त असून, ते 20 रुपये लिटर दराने उपलब्ध होऊ शकते. आसाम पेट्रोकेमिकल्समध्ये सध्या मिथेनॉलचे उत्पादन होत असून, या प्रकल्पाची दैनिक उत्पादनक्षमता 100 टनांची आहे.