कर्जत : संतोष पेरणे
आबालवृद्ध पर्यटकांची लाडकी माथेरानची राणी अर्थात नेरळ-माथेरान मिनीट्रेन या वर्षी पावसाळ्यात माथेरानच्या डोंगरात झालेल्या भूस्खलनामुळे वाहून गेलेला नॅरोगेज मार्ग दुरुस्त करण्याच्या कामासाठी बंद आहे. ही मिनीट्रेन पुन्हा सुरू व्हावी याकरिता मध्य रेल्वे प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. नवीन वर्षात ती सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्याआधी अमन लॉज-माथेरान अशी शटल सेवादेखील सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
मिनीट्रेनची सेवा माथेरान घाटातील पावसाळा लक्षात घेऊन दरवर्षी बंद केली जाते. 15 जूनपासून बंद होणारी ही सेवा 15 ऑक्टोबरनंतर पूर्ववत केली जाते. यंदा 15 जूनच्या आधीच मिनीट्रेनची सेवा बंद करण्यात आली होती, तर अमन लॉज-माथेरान ही शटल सेवा जूनमध्ये झालेल्या वादळी पावसानंतर जुलै 2019मध्ये बंद करण्यात आली होती. त्या वेळी पावसाळा असल्याने कोणत्याही प्रकारची दुरुस्तीची कामे करता आली नव्हती. मिनीट्रेनची थेट सेवा किंवा शटलदेखील उपलब्ध नसल्याने माथेरानला या वर्षीच्या पावसाळ्यात पर्यटक फार कमी आले. परिणामी माथेरानमधील पर्यटन व्यवसाय संकटात आला होता.
मिनीट्रेनची सेवा सुरू व्हावी या अनुषंगाने मध्य रेल्वेचे पहिल्यापासून प्रयत्न आहेत. यासाठी खर्चाची तरतूद रेल्वे प्रशासनाने करून ठेवली असून, मिनीट्रेन सुरू करून हा मार्ग पर्यटकांसाठी खुला करण्याचा मनोदय आहे.
-ए. के. सिंग, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे