कर्जतमध्ये नियोजन बैठक संपन्न
कडाव : प्रतिनिधी
मराठा क्रांती मोर्चाची जनसंवाद यात्रा रायगड जिल्ह्यात येणार असून, यात्रेच्या तयारी संदर्भात गुरूवारी (दि. 21) संध्याकाळी कर्जतमधील रॉयल गार्डन सभागृहात संबंधीतांची बैठक झाली. या बैठकीत जनसंवाद यात्रेच्या पूर्वतयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील रायगड जिल्ह्यातील जनसंवाद यात्रेची सुरुवात 26 आक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता वावोशी (ता. खालापूर) येथून होणार असून, पालीफाटा, खोपोलीफाटा, पळसदरी, कर्जत चारफाटा, कडाव, चौक, लोहप, मोहपाडा, दांडफाटा, बारवई पूल, आजीवली, करंजाडे, कामोठे, खारघर, कळंबोली, खांदाकॉलनी मार्गे ही जनसंवाद यात्रा सायंकाळी 7 वाजता पनवेल येथे येणार आहे. तेथे खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांची जाहीर सभा होणार आहे. या जनसंवाद यात्रेची नियोजन बैठक गुरुवारी कर्जतमध्ये झाली.
मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विनोद साबळे तसेच राम राणे, मधुकर घारे, राजेश लाड, राजेश जाधव, प्रदीप ठाकरे, जगदीश ठाकरे, प्रथमेश मोरे, संपत हडप, ज्ञानेश्वर भलीवडे, सुरेश बोराडे, अनिल भोसले, प्रकाश पालकर, शिवशाहीर गणेश ताम्हाणे, शिवव्याख्याते अक्षय तिखंडे, प्रमिलाताई बोराडे, सरस्वती चौधरी, विद्या म्हसे, पूजा सुर्वे यांच्यासह कार्यकर्ते या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा क्रांती मोर्चा तर्फे मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रा काढण्यात येणार आहे. जोपर्यंत मराठा समाजाला न्याय दिला जाणार नाही, तोपर्यंत आमचा लढा कायम राहील
-विनोद साबळे, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा