लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

उरण : रामप्रहर वृत्त
उरण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभ जल्लोषात साजरा झाला. विद्यालयाचे आधारस्तंभ रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात विद्यालयाच्या विविध शालेय अंतर्गत स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांनी आपल्या भाषणातून या विद्यालयाचे माजी विद्यार्थी असणार्या आदरणीय रामशेठ ठाकूर यांच्या या विद्यालयाच्या व रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या परिसरातील शैक्षणीक जडणघडणीमधील अतुलनीय योगदानाबद्दल गौरवोद्गार काढून विद्यार्थ्यांशी हसतखेळत हितगुज केले. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समतीचे सदस्य अरुणशेठ भगत यांनी आपल्या भाषणामध्ये आदरणीय रामशेठ ठाकूर यांच्या प्रेरणेने या विद्यालयाचा नावलौकिक उंचावत राहील असा ठाम विश्वास व्यक्त केला. विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांनी प्रास्ताविक केले.पारितोषिक वितरण समारंभानंतर झालेल्या स्नेहसंमेलनात अर्थात विविध गुणदर्शनाच्या रंगारंग कार्यक्रमात विद्यार्थी कलाकारांनी गायन, नाट्य व नृत्याविष्काराने रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळविली. पंचक्रोशीतील बहुसंख्य पालक, प्रेक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी पनवेल पंचायत समितीच्या सदस्या रत्नप्रभाताई घरत, गव्हाण ग्रामपंचायतच्या सरपंच हेमलता भगत, स्थानिक शाळा समितीचे सदस्य आनंता ठाकूर व विश्वनाथ कोळी, वसंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, कामिनी कोळी, इंदूताई म्हात्रे, जयवंतराव देशमुख, मदनशेठ पाटील, भाऊ भोईर, राजेंद्र देशमुख, वामन म्हात्रे, पी. के. पाटील, सुनील पाटील, संस्थेचे आजीव सदस्य उपशिक्षक प्रमोद कोळी, उपप्राचार्य राजकुमार चौरे, अटल टिंकरिंग लॅब प्रमुख रविंद्र भोईर, ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख पी.बी. पाटोळे, गुरुकुल प्रमुख संदीप भोईर आदी उपस्थित होते. गुरुकुल विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या निवड समितीचे सदस्य चित्रलेखा पाटील व प्रसन्न ठाकूर तसेच बक्षीस वितरण समितीच्या सदस्या द्रौपदी वर्तक यांनी सांस्कृतिक विभागप्रमुख ज्योत्स्ना ठाकूर यांच्या सहकार्याने नियोजन केले. संगीतकार साई मोकल व राजकुमार चौरे यांची संगीत साथ लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर रंधवे व ज्योत्स्ना ठाकूर यांनी केले. पर्यवेक्षक दीपक भर्णूके यांनी आभार मानले.