वाहनचालकांना पर्यायी रस्त्याचा मोठा फेरा; विद्यार्थ्यांना शाळेलाही होणार उशीर
कर्जत : बातमीदार
नेरळ पूर्व व पश्चिम यांना जोडणारा एकमेव मार्ग म्हणजे पाडा येथील रेल्वे फाटक रस्ता. मात्र नेरळ शहरात सुरू असलेल्या अंतर्गत रस्त्यांच्या कामांमुळे आता नेरळमधील पाडा येथील रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. नेरळ पूर्व भागातील सुमारे 50 च्या वर गावे, वाड्या-पाड्यांना जोडणारा रस्ता बंद झाल्याने पर्यायी रस्त्याचा मोठा फेरा मारावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच कोंडी झाली आहे तर स्कुलबसने जाणार्या विद्यार्थ्यांना शाळेला उशीर होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
वाढती लोकसंख्या आणि नागरिकीकरण पाहता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुमारे 23 कोटींचा निधी नेरळ शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी दिला होता. तो जिल्हा परिषदेकडे वर्ग करून डिसेंबर 2016 मध्ये नेरळमधील रस्त्यांच्या कामाचे कार्यारंभ आदेश निघाले. मात्र ठेकेदाराच्या निरुत्साही कामामुळे 2 वर्ष उलटून गेले तरी आजही केवळ रस्त्यांची कामेच सुरु आहेत. संबंधित ठेकेदाराने आता नेरळमधील अंबिका नाका ते पाडा या रस्त्याचे काम सुरु केले आहे. सुमारे 2 कोटी 72 लाख 72 हजार 546 रुपये खर्च करून पाडा येथील सिमेंट काँक्रीट रस्ता करण्यात येत आहे. मात्र हे काम करण्यासाठी हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्याला पर्याय म्हणून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने आंबिवली गेट व दामत गेट असे मार्ग वापरण्याचे सुचविले आहे. मुळात हे दोन्ही मार्ग वाहन चालविण्याच्या योग्यतेचे राहिलेलेच नाहीत.
नेरळ पूर्व भागात मोठ्या प्रमाणात रहिवासी क्षेत्र असून सुमारे 50 गाव, वाड्या, पाडे यांना नेरळ बाजारपेठेत खरेदीसाठी यावे लागते. तसेच येथून रोज विद्यार्थ्यांची ने -आण करणारी स्कुल बस देखील जात असते. मात्र पाडा येथील रस्ता बांधकाम विभाग व ठेकेदाराने बंद केल्यामुळे वाहनचालकांना सुमारे 3 ते 4 किलोमीटरचा https://www.tuttotek.it/web-social/speciali-web-social/come-saper-scegliere-il-gioco-adatto-per-te-e-quali-sono-possibilita-che-offrono-le-piattaforme फेरा पडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहचायला उशीर होत आहे.
या रस्त्याच्या कामादरम्यान छोटी वाहने जातील एव्हडी मार्गिका पाडा येथील रस्त्याजवळून सुरु ठेवावी, अशी सूचना नागरिकांनी नुकताच झालेल्या कर्जत पंचायत समितीच्या आमसभेत केली होती. त्यावेळी बांधकाम विभागाचे उपअभियंता ए. ए. केदार यांनी मार्गिका सुरु ठेऊ, असे सांगितले होते. मात्र बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी मनमानी करत सदरचा रस्ता पूर्णपणे बंद केला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचा सूर उमटत आहे.