Breaking News

पारध, झोंबी अन् बैलदिवाळीचा थरार

पोलादपूर तालुक्यातील पारंपरिक सण व मर्दानी खेळ विविध कायद्यांच्या कचाटयात अडकू नये आणि परंपरादेखील जपल्या जाव्यात यासाठीचे प्रयत्न ग्रामीण भागात सुरू असून पारध,झोंबी अन् बैलदिवाळीचा थरार अनुभवण्यासाठी पोलादपूरच्या ग्रामीण जनतेचे गुपचूप कोकण पर्यटन सुरू आहे.

मार्गशीर्ष महिन्यामध्ये तालुक्यातील शेतकरीवर्ग गोठयात बांधलेल्या बैलांची अकड म्हणजे सुस्तावस्था कमी करून त्याच्यामध्ये चुणचुणीतपणा आणण्यासाठी बैलदिवाळी साजरी करतो. यामध्ये बैलाच्या शिंगाला बांधलेला झुपकेदार तुरा ओढून काढण्याचा मर्दानी खेळही समाविष्ट असतो. याचदरम्यान, रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात बैलगाडयांच्या शर्यती सुरू होतात. बैलदिवाळी आणि बैलगाडयांच्या शर्यती सुरू असतानाच अलिकडे गुपचूप काही गावांतील रेडयांच्या झोंब्यांची माहिती सर्वत्र पोहोचते आणि हजारोच्या संख्येने वेगवेगळया भागातील झोंबीचे शौकीन झोंबी असलेल्या गावाकडे आवर्जून जातात. सध्या महाड व पोलादपूर तालुक्यांमध्ये अशाप्रकारच्या रेडयांच्या झोंब्यांचे सत्र कोकण पर्यटन या सदराखाली न येताच गुपचूपपणे सुरू असल्याचे ऐकण्यास मिळत आहे. गुरूवारी पौष पौर्णिमेला देव पारधीला जाण्याची प्रथा कोकणात सर्वत्र पाळली जाते. पौष महिन्यात अनेक शुभकार्य टाळली जात असतात. त्यामुळे एक दिवस संक्रांत आणि अनेक दिवस किंक्रांत असा मांसाहारी महिना असल्याचे काही मांसाहार शौकिनांकडून या महिन्याचे सर्व दिवस शिकार म्हणजेच पारध करून साजरे केले जातात.

महाशिवरात्रीच्या कथांमध्ये व्याधाने म्हणजेच पारध्याने हरिणीवर नेम धरण्यासाठी ज्या झाडाची पाने तोडली… ते बेलाचे झाड होते आणि झाडाखाली महादेवाची पिंडी असते…हरिणीवर दया करून शेवटी शिकार न करताच पारधी परततो…त्याला उपवासही घडतो आणि पानं तोडताना ’ॐ नम:शिवाय।’चा जपही घडतो आणि सोबतच त्याच्या हातून हरिणीची हत्या टळते…अशी पौराणिक कथा समाविष्ट असताना पूर्वीच्या दंडकारण्यात म्हणजे कोकणाचा काही भाग आणि सातारालगतचा भाग असलेल्या गावांमध्ये मात्र पौष पौर्णिमेनंतर देव पारधीला जात असल्याची भूतदयेपासून पळवाट दाखविणारी परंपरा प्रचलित आहे. याकाळात शिकार करण्याच्या प्रयत्नांत पोलादपूर तालुक्यातील चांभारगणी आड आदिवासीवाडीतील एका व्यक्तीचा सावजासाठी लावलेल्या इलेक्ट्रीक सापळयामध्ये शॉक लागून मृत्यू तर दुसरा गंभीररित्या जखमी झाल्याची घटना दोन वर्षांपूर्वी झाली होती. वन्यजीवांच्या जीवावर बेतणारी आणि सदोष मनुष्यवधाचेही कारण ठरणारी ही अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी वारकरीबहुल पोलादपूर तालुक्यातील समाजधुरिणांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

पौष पौर्णिमेपासून देव पारधीला निघालेत…या जुन्या रूढ परंपरेतून शिकार म्हणजेच पारध करण्याची परंपरा तत्कालीन दंडकारण्यात म्हणजे सध्याच्या महाड, पोलादपूर, महाबळेश्वर, जावळी, खेड, मंडणगड, दापोली अशा तालुक्यामध्ये पाहण्यास मिळते. या तालुक्यांच्या ग्रामीण भागांमध्ये सध्या रानडुक्करं, मोर, लांडोरी, रानकोंबडे, ससे, रानमांजर, साळींदर, भेकर अशा वन्यजीवांची सर्रास पारध करण्याचा प्रकार गावकी स्वरूपात सुरू झाला आहे. संतांच्या वचनांचा प्रभाव हरिनाम सप्ताहांच्या सांगतेनंतर अल्पावधीत संपून पौषाच्या पौर्णिमेनंतर संत माहात्म्यांनी सांगितलेली प्राणिमात्रांबाबतची भूतदया मात्र परंपरांच्या अमानुषतेमध्ये कोठे गायब होते हे या वारकरीबहुल तालुक्यामध्ये समजूनही येत नाही. मुंबई बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर सिनेअभिनेता संजय दत्त याला महाड तालुक्यात रायगडनजिक शिकारीसाठी सशस्त्र आल्याच्या खबरीचा बेकायदेशीर हत्यार बाळगल्याच्या गुन्ह्याच्या प्रकरणात समावेश असल्याने तो अद्याप शिक्षा भोगत आहे. सलमानखान आणि अन्य सिनेतारकांवरील राजस्थानमधील वन्यजीवांच्या शिकारीचे प्रकरणही अद्याप चर्चेत आहे. त्याच धर्तीवर वन्यजीव संरक्षण कायद्याचे अज्ञान अथवा जुन्या अमानुष परंपरांचा पगडा ग्रामीण भागावर अद्याप कायम असल्याने शिकारीचा हा शौक आजही जोपासला गेला आहे.  सहा वर्षांपूर्वी महाडच्या एस.टी.स्थानकामध्ये वाघाचे कातडे घेऊन जाणार्‍या तिघांना पकडले. ते पोलादपूर तालुक्यातील शिकारीतून मारलेल्या वाघाचे होते असे निदर्शनास आले होते. गेल्या दोन वर्षांपूर्वी असेच अन्य तिघेदेखील मुंबईनजिक वाघनखे व कातडे विकण्यास गेले असता पकडले गेले होते. मात्र, याबाबत स्थानिक वनविभाग फारसे गांभिर्याने पाहात नाही.

चिकन आणि बोकडाचे मटन महाग झाल्याने फुकटच्या पारधीचा पर्याय स्विकारणार्‍यांना कायद्यात अडकल्यावर हा पर्यायच अधिक महाग असल्याचे सलमान खान व अन्य बहुचर्चित प्रकरणांमुळे जाणवू शकणार असताना भेकराची पिल्ले बकरीच्या पिल्लांमध्ये चरून झाल्यानंतर सोबत आल्याचे निमित्त करून पाळली असल्याची तक्रार आल्यानंतर फणसाड अभयारण्यामध्ये सोडण्यापूर्वी तीनपैकी एक भेकराचे पिलू मरण पावले आणि त्याचे शवविच्छेदन करून पोलादपूरच्या पशूवैद्यकीय दवाखान्याबाहेरच्या मैदानात पुरण्यात आल्याचा खोटा दावा करण्यात आला होता.

वनजीवांच्या जीवावर उठणार्‍या प्रथेमुळे 2013मध्ये पोलादपुरातील चांभारगणी आड आदिवासीवाडीतील विठ्ठल पवार याचा सावजासाठी लावलेल्या इलेक्ट्रीक सापळयामध्ये शॉक लागून मृत्यू तर दुसरा कृष्णा पवार हा गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली. सध्या देव पारधीला निघाले… अशी प्रथा चालवताना देवाला कळे लावून शिकारीचा कौल घेण्याचीही प्रथा काही गावांत सुरू असून भातपिकाची कापणी झाल्यानंतर शेतातील पिकाचा बुंधा उकरून मुळांशी असलेला मऊ भाग खाण्यासाठी येणार्‍या रानडुकरांची पारध करणारे रानडुकरांच्या झुंडींची संख्या वाढणे शेतकर्‍याला हानीकारक असल्याचे सांगून गावकी पध्दतीने सामूहिक शिकार करण्यास सज्ज झाले आहेत.

या अमानुष परंपरांच्या शौकिनांचे कायद्याच्या विरोधात वर्तन होत असल्याने ते या कायद्याविरोधात संस्कृती रक्षणाचे हत्यार उपसून या परंपरांतील अमानुषतेला प्रोत्साहन देऊ पाहात आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांना या शौकिनांकडून चिथावणी दिलेल्या लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे तर या अनिष्ट प्रथांबाबत जनतेचे प्रबोधन करण्याच्या प्रयत्नांनाही हाच अनुभव घ्यावा लागत असल्याने कायद्याची व्यापक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता निर्माण होण्यासोबतच विविध आध्यात्मिक सांप्रदायांतील प्रमुखांनी या अमानुष परंपरांविरोधात ग्रामीण जनतेचे प्रबोधन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पोलादपुरातील ग्रामीण परंपरेआड न येण्याची दक्षता सातत्याने निवडणुका व राजकारण्यांना लोकाश्रय मिळविण्याची अपरिहार्यता असल्याने पोलीस, वनविभाग आणि प्रशासन घेत असल्याने कोकण पर्यटनाचा गुपचूप आनंद घेण्यासाठी पोलादपूर तालुका सध्या शहरी शिकारीबाबूंच्या रात्रीच्या वर्दळीने सर्वदूर ख्याती प्राप्त झालेला आहे.

-शैलेश पालकर

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply