Breaking News

नेरळ कुंभारआळी शाळेचे भिजत घोंगडे; इमारत पाडून तीन वर्षे पूर्ण

कर्जत ़़: बातमीदार

नेरळ  कुंभारआळी भागातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेची नवीन इमारत बांधण्यासाठी जुन्या इमारती पाडण्यात आल्या आहेत, त्याला तीन वर्षे पूर्ण झाली असून नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती नाही. दरम्यान, इमारत उपलब्ध नसल्याने त्या शाळेचे विद्यार्थी एकाच इमारतीमध्ये दाटीवाटीने बसून शिक्षण घेत आहेत.

नेरळ गावातील कुंभारआळी येथे असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या तीन इमारती होत्या. त्यातील कौलारू इमारतीमध्ये पाच वर्ग आणि षटकोनी इमारतीमध्ये एक वर्ग भरविले जात होते. त्या सर्व इमारती 2016मध्ये जिल्हा परिषदेने पाडल्या असून, त्या जागी नवीन इमारती उभ्या करण्याची कार्यवाही अद्याप सुरू झालेली नाही. शाळेच्या जुन्या इमारती पाडण्यात आल्या त्या ठिकाणी 12 वर्गखोल्या नव्याने बांधण्यात येणार होत्या. मात्र  अजतागत नेरळ कुंभारआळी भागातील शाळेची नवीन इमारत उभी राहू शकलेली नाही. त्यामुळे कुंभारआळी शाळेत जाणारे विद्यार्थी हे बाजूच्या शाळेत दाटीवाटीने बसत आहेत. त्या ठिकाणी असलेल्या उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांचे स्थलांतरण करून त्या इमारतीत कुंभारआळी शाळेतील विद्यार्थी बसत आहेत.तर 2016 मध्ये पाडण्यात आलेल्या तीन इमारतीतील काही वर्गखोल्यात अंगणवाड्या भरवल्या जायच्या. त्या अंगणवाड्या सध्या शिवाजी महाराज मैदानात भरवल्या जात आहेत. ही स्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी नवीन वर्ग खोल्या बांधण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेकडून होण्याची आवश्यकता आहे. परंतु भूमिपूजन झालेल्या इमारतीचे बांधकाम गेल्या तीन वर्षात होऊ शकले नाही, याची आश्चर्य नेरळकरांना वाटत आहे.

12 वर्गखोल्यांच्या नवीन दुमजली इमारतीचे काम सुरु होण्यापूर्वी ज्या सहा वर्गखोल्या कुंभारआळी शाळेच्या आवारात होत्या, त्या तरी बांधून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

नेरळ कुंभारआळी शाळेचा विषय हा चौकशीच्या फेर्‍यात अडकला असून, रायगड जिल्हा परिषद त्याची स्वतंत्र चौकशी करीत आहे. त्यामुळे आपल्याला त्याबाबत काहीही अधिक सांगता येणार नाही.

– सुरेखा हिरवे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, कर्जत

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply