Breaking News

राष्ट्रवादी-सेना-शेकापत जुंपली, खोपोलीत पालिकेच्या नूतन कार्यालय नामकरणावरून तू…तू मै…मै…

खोपोली : प्रतिनिधी

राज्यातील महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना व शेकापमध्ये खोपोली नगरपालिका नूतन कार्यालयाच्या नामकरणावरून तू…तू मै…मै…सुरू असून, त्यातून मार्ग काढताना नगरपालिका प्रशासनाच्या नाकी नऊ आले आहेत.

येथील नगरपालिकेचे नूतन प्रशासकीय संकुल तयार असून काही पुढील महिन्यात त्याचे उद्घाटन करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या नूतन कार्यालयाच्या नामकरणाबाबत राष्ट्रवादी, शिवसेना व शेकापमध्ये जुंपली आहे. या तिनही राजकीय पक्षांकडून आपापल्या पसंतीच्या नेत्यांचे नाव या कार्यालयास देण्याची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे इमारत एक व प्रस्ताव अनेक आल्याने यातून सर्वमान्य मार्ग काढण्यासाठी नगरपालिका प्रशासनाची कसरत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिवसेना नगरसेवक व पक्ष नेत्यांकडून सदर संकुलास स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी होत असतानाच शेकापकडून प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावासाठी आग्रह धरण्यात येत आहे. तसे लेखी निवेदन शेकाप नगरसेवक व पक्ष नेत्यांनी नगरपालिका प्रशासनाला दिले आहे. दरम्यान, खोपोलीच्या विकासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे मोलाचे योगदान असल्याने या प्रशासकिय संकुलास शरद पवार यांचे नाव देण्याची आग्रही मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक व पक्ष नेत्यांनी केली आहे. या बाबत राष्ट्रवादीकडूनही नगराध्यक्ष व मुख्याधिकारी लेखी निवेदन  देण्यात आले आहे. खोपोली नगरपालिकेतील सर्व महत्वाचे पक्ष व त्यांच्या नगरसेवकांकडून वेगवेगळ्या नावासाठी आग्रह धरण्यात येत असल्याने, यावर सर्वमान्य मार्ग काढण्यासाठी प्रशासनास मोठी कसरत करावी लागणार आहे. या बाबत एका ज्येष्ठ नगरसेवकांने दिलेल्या माहितीनुसार सर्व सहमतीने एक नावाचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल, मात्र असे न झाल्यास सदर विषयाबाबत लोकशाही पध्दतीने बहुमताचा कौल घेऊन तो निर्णय अंतिम होऊ शकतो. असे झाल्यास नगरपालिकेत राष्ट्रवादीचे संख्या बळ सर्वाधिक असून नगराध्यक्ष पदावरही राष्ट्रवादीच्या सुमन औसरमल असल्याने त्यांचा निर्णय जवळपास अंतिम असणार असल्याचे त्यांनी सांगितले. नामकरणावरून खोपोलीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply