
पनवेल : रामप्रहर वृत्त
स्थानिक खेळाडूंना हक्काचे मैदान असावे व सरावासाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा सहजगत्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती ब चे सभापती संजय दिनकर भोपी यांनी खांदा कॉलनीमध्ये सोयी-सुविधायुक्त क्रीडा संकुल उभारा, अशी मागणी केली आहे. भोपी यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, खांदा कॉलनी विभागातील मोकळी मैदाने सिडकोने शैक्षणिक संस्थांच्या ताब्यात दिल्याने शैक्षणिक संस्था मनमानी करीत आहे. त्यामुळे सध्याच्या स्पर्धात्मक युगात स्थानिक खेळाडूंना दैनंदिन सरावासाठी तसेच विविध मैदानी स्पर्धा आयोजित करण्यासाठी मैदान देण्यास टाळाटाळ करीत असतात. अनेक प्रतिभावान खेळाडूंना आपला दैनंदिन सराव करणे शक्य होत नसून आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खांदा कॉलनीतील प्रतिभावान खेळाडूंना जागतिक स्तरावर आपला ठसा उमटविण्यास मदत व्हावी या हेतूने सभापती संजय भोपी यांनी खांदा कॉलनीमधील सेक्टर 11 येथील 29000 चौ. फूट क्षेत्रफळाचा भूखंड जो सिडकोने पार्कसाठी आरक्षित ठेवलेला आहे तो महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर या भूखंडावर अद्ययावत सोयी-सुविधायुक्त क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात यावी याबाबतच्या आग्रही मागणीचे लेखी निवेदन आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिका आयुक्त, महापौर व सभागृह नेते यांना दिले आहे.