Breaking News

पोलीस ठाण्याची पडीक इमारत ठरतेय अवैध धंद्यांचे ठिकाण

खालापूर : प्रतिनिधी

औद्योगिक वसाहत व बोरघाटातील वाहतुकीचा ताण तसेच शहराची झपाट्याने होणारी वाढ या कारणाने खोपोलीत 1972 मध्ये नव्याने पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती. सुरुवातीला रायगड जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ग्रामीण विकास यंत्रणा विक्री केंद्राच्या इमारतीमध्ये भाडेपट्ट्यावर खोपोली पोलीस ठाण्याचे कार्य चालू होते, मात्र 10 वर्षांपूर्वी खोपोली पोलीस ठाणे नव्या जागेत स्थलांतरित झाले. तेव्हापासून जुनी इमारत पडीक अवस्थेत आहे. या पडीक इमारतीमध्ये सध्या मोकाट गुरे, गाढवे, डुक्कर यांचा वावर सुरू असतो, तर रात्री येथे अवैध धंदे चालतात.

मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या या पडीक इमारतीच्या 15 गुंठे जागेत जिल्हा परिषदने  विश्रामगृह उभारावे, अशी मागणी खोपोली, खालापुरातील पत्रकार करीत आहेत. खोपोलीमध्ये गगनगिरी आश्रम  व बोरघाट तसेच शासकीय कामासाठी येणार्‍या मंत्री व अधिकार्‍यांना राहण्यासाठी खोपोलीत शासकीय निवासस्थान नसल्याने त्यांना खासगी हॉटेलात राहावे लागत आहे, तर खोपोली शहर बोरघाटाच्या पायथ्याशी असल्याने खोपोलीत थांबणे प्रवासी पसंत करतात.

खोपोलीतील अंबा बागसमोर असणारे सार्वजनिक बांधकाम खाते, मुंबई-पुणे महामार्ग यांच्या मालकीचे विश्रामगृह गेल्या पाच वर्षांपासून बंद करण्यात आले असून भूत बंगला म्हणून कुपरिचित ठरलेली ही इमारत अखेरची घटका मोजत असल्याने खोपोलीत शासकीय विश्रामगृह असणे अत्यावश्यक झाले आहे. जि पच्या मालकीच्या जागेवर विश्रामगृह बांधावे, अशी मागणी खोपोली-खालापुरातील पत्रकार करीत आहेत.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply