Saturday , December 3 2022

महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच

प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या दाव्याने महाविकास आघाडीत खळबळ

मुंबई ः प्रतिनिधी

आगामी 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवेल आणि राज्यात पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करून केला आहे. पटोलेंच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सपशेल अपयश आले आहे. अगदी हातात असलेल्या पंजाब राज्याची सत्तादेखील काँग्रेसने गमावली. यानंतर आता काँग्रेसच्या नेतृत्वबदलाबाबत पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक रविवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. एकीकडे या घडामोडी घडलेल्या असताना दुसरीकडे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठा दावा केला आहे. नाना पटोले यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा काँग्रेस मिळवणार आणि पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असणार असे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याआधीही अनेकदा पटोले यांनी स्वबळाची भाषा केल्याने चर्चा रंगल्या होत्या. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असला तरीदेखील स्थानिक निवडणुकात काँग्रेसने स्वबळावरच लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यातच आता पटोलेंनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबतही भाष्य केल्याने आघाडीत आलबेल नसल्याचे चित्र आहे.

Check Also

राजिपकडून जनतेला मिळणार महत्त्वपूर्ण ऑनलाइन सुविधा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद (राजिप) प्रशासनाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या कशा सुविधा …

Leave a Reply