आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन; मान्यवरांची उपस्थिती
खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त
सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाचे स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात झाले. नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर विद्यालयाच्या भव्य सभागृहामध्ये हा स्नेहमेळावा झाला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, कस्टमचे निवृत्त सहाय्यक कमिशनर अभय पोयरेकर, वीरपत्नी वीणा पोयरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते संघाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात झाले.
या वेळी विशेष प्रावीण्य मिळविलेल्या सिंधुदुर्गवासी विद्यार्थ्यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते झाला. संस्थेच्या ऊर्जितावस्थेसाठी स्थापनेपासून कार्यरत असणार्या पदाधिकार्यांना ’जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संघाला वेळोवेळी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन करणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, डॉ. भगवान बिरमोळे, अभय पोयरेकर, मंगेश परुळेकर यांना ’सिंधुरत्न’ पुरस्काराने
गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचा प्रारंभ मालवणी परंपरेनुसार देवांचे गार्हाणे करून झाला. त्यानंतर नांदी, नृत्य, जोगवा, लावणी, गायन, वादन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम झाले. प्रिया खोबरेकर व रश्मी वाघाटे या महिलांच्या पखवाजवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. याचबरोबर महिलांनी सादर केलेला महाराष्ट्राची लोकधारा हा मराठमोळ्या नृत्याचा कार्यक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. अपूर्वा प्रभू व रंगनाथ नेरुरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे अध्यक्ष केशव राणे, उपाध्यक्ष संतोष चव्हाण, प्रीता भोजने, सचिव बाप्पा मोचेमाडकर, सहसचिव प्रदीप रावले, दीपक तावडे, खजिनदार अनिल नेमळेकर, बाबाजी नेरुरकर यांच्यासह
संघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.