पनवेल : वार्ताहर
खांदेश्वर रेल्वे स्टेशनमध्ये एका व्यक्तीला नकली सोन्याचे दागिने विकून फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या दोन जणांना राजे प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पकडून पनवेल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून नकली सोन्याचे दागिने विकून फसवणूक करणार्या टोळीचे प्रमाण वाढीस लागले होते. पाच ते सहा दिवसांपूर्वी राजे प्रतिष्ठानचे सदस्य व केश कर्तनालयाचे मालक अमित पंडित यांना काम करत असताना पनवेल रेल्वे स्थानकाजवळ के मॉलच्या बाजूला दोन व्यक्तींनी ओळख वाढवून आमच्याकडे प्राचीन चांदीचे नाणे असून आम्हाला जमिनीत एक हंडा भेटला आहे व त्यात सोन्याचे दागिने तसेच चांदीची 200 नाणी आहेत असे सांगितले.
एक सोन्याचा मणी देऊन चेक करा हा खरा आहे व आमच्याकडे असे बरेच दागिने आहेत असे सांगितले, मात्र हा फसवणूकीचा प्रकार आहे असे लक्षात येताच त्यांनी राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक व पत्रकार केवल महाडिक यांना ही बाब सांगितली. त्यानूसार केवल महाडिक यांनी अमित पंडित यांना त्यांच्याकडे सोने घेण्यास जाण्यास सांगून त्यांना खांदेश्वर रेल्वे स्थानक येथील प्लॅटफॉर्मवर नकली दागिन्यांसह रंगेहात पकडून प्रथम खांदेश्वर पोलिसांच्या ताब्यात दिले.