पोलादपूर : प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत वाहणार्या सावित्री नदीपात्राजवळच्या जमिनीवर शनिवारी (दि. 28) पहाटे एका टँकरमधून विषारी केमिकल जमिनीवर सोडण्यात आले. त्यानंतर वायू प्रदूषण होऊ लागल्याने या मातीवर पाण्याचा मारा करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ते पाणी सावित्री नदीपात्रात गेल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडून पाण्यावर तरंगू लागले. पोलादपूर तालुक्यातील पार्ले आणि पार्लेवाडी गावानजीक शनिवारी पहाटेच्या सुमारास एका अज्ञात टँकरमधील द्रवरूप केमिकल मोकळ्या जागेत ओतण्यात आले. त्यानंतर केमिकलचा दर्प हवेमध्ये पसरू लागल्याने एका डम्परमधून माती आणून त्या ठिकाणी पसरवण्यात आली. दुपारी उन्हामुळे केमिकलचा वास परिसरातील सर्वांना त्रासदायक होऊ लागला. त्यामुळे टँकरद्वारे पाणी ओतून जमीन धुतली गेली, मात्र केमिकलमिश्रित मातीयुक्त पाणी थेट सावित्री नदीच्या पात्रामध्ये मिसळले गेले आणि नदीपात्रातील मृत व मरणासन्न अवस्थेत जलचर मोठ्या प्रमाणावर पाण्यावर तरंगू लागले. त्यामध्ये खवले, वांब, सकला, शिवडा आदी मासे तसेच बेडूक व अन्य जलचरांचा समावेश होता. दरम्यान, या घटनेची माहिती पोलादपूरच्या तहसीलदार दीप्ती देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, गटविकास अधिकारी डॉ. भूषण जोशी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांच्या कानावर गेल्यानंतर तातडीने यंत्रणा जागी झाली आणि सर्वप्रथम मासे गोळा करून नेणार्यांकडून सर्व मासे हस्तगत करून विल्हेवाट लावण्यात आली. नदीलगत ज्या गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या जॅकवेल आहेत, त्या रिकाम्या करण्यात आल्या. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोनवणे आणि पोलादपूर पंचायत समिती पाणीपुरवठा योजनेचे पाटील यांनी नदीपात्रातील पाण्याचे नमुने घेतले आणि त्याची रासायनिक तपासणी करण्यासाठी पाठविले. रानबाजीरे धरणाचे पाणी सावित्री नदीपात्रात सोडण्यासंदर्भात तहसीलदार दीप्ती देसाई यांनी महाड औद्योगिक वसाहतीतील धरण विभागासोबत पत्रव्यवहार केला आहे. गटविकास अधिकारी डॉ. भूषण जोशी यांनी पार्ले येथील ग्रामसेवकामार्फत नदीचे पाणी प्रदूषित करणार्या अज्ञात केमिकल टँकर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले आहे. मात्र या पत्रव्यवहारानंतर प्रत्यक्ष कोणतीही कृती झालेली दिसून येत नाही. परिसरामध्ये केमिकलचा दर्प आणि दुर्गंधी अद्याप कायम आहे.