मुरूड : प्रतिनिधी
पर्यटन महोत्सवामधील प्रसिद्ध कलाकारांच्या न्यू ईअर कल्ला या कार्यक्रमात बेधुंद संगीतावर ताल धरत सुमारे 20 हजार पर्यटकांनी मुरूडच्या समुद्र किनार्यावर सरत्या वर्षाला बाय बाय करत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. मंगळवारी सायंकाळपासून मुरूड समुद्रकिनार्यावर पर्यटकांची गर्दी झाली होती. पर्यटक सायंकाळच्या सप्तरंगात घोडागाडीची सफर करताना दिसत होते. तर काही समुद्रात बोटिंग करून लाटांशी खेळत होते. मोटर बाइकवर वाळूतील सफारीचा आनंद घेत होते. बघता बघता मारुती नाका ते गणेश पाखाडी नाक्यापर्यंत वाहनांची गर्दीच गर्दी पाहावयास मिळाली. रात्री तीन किलोमीटरचा समुद्रकिनारा जनसमुदायाने गच्च भरला होता. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. मध्यरात्री 12 वाजता मुरूडच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी उपस्थित पर्यटकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. समुद्रकिनारी मांडण्यात आलेल्या फूड फेस्टिव्हलमध्ये पर्यटकांनी विविध खाद्यपदार्थ चाखण्याचा आनंद घेतला, तर लहान मुलांनी आकाश पाळणा, धावती ट्रेन, विविध खेळांचा आनंद लुटला. समुद्र किनार्यावरील सर्व स्टॉल्सवर प्रचंड गर्दी दिसून आली. मुरूड शहरातील सर्व लॉजिंग आणि बोर्डिंग 5 जानेवारीपर्यंत बुक असल्यामुळे मुरूड शहर सध्या पर्यटकांनी फुलून गेले आहे.