प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न सुरू
पनवेल : बातमीदार
विमानतळ परिसरातील बांधकाम उंची मर्यादेमुळे अडगळीत पडलेला सिडकोचा कोट्यवधी रुपये उत्पन्न देणारा बेलापूर येथील पारसिक टेकडीवरील ‘खारघर हिल प्लॅट्यू’ प्रकल्प बांधकामाच्या आशा उंचावल्या आहेत. येथील बांधकाम उंचीची अट शिथिल झाल्याने या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दहा वर्षांपूर्वी सिडकोने या थीम प्रकल्पासाठी निविदा मागविल्या होत्या आणि त्याला एका बांधकाम कंपनीने थेट एक हजार 530 कोटी रुपयांचा देकार दिला होता. अमेरिकेतील हॉलिवूड हिलच्या धर्तीवर येथे बॉलीवूड हिल विकसित केली जाणार होती. नवी मुंबई शहर प्रकल्पासाठी राज्य शासनाने खासगी, शासकीय व मिठागरांची 344 किलोमीटर जमीन सिडकोला हस्तांतरीत केली आहे. यात बेलापूर येथील बेलापूर टेकडी ते खारघर येथील पारसिक टेकडी यातील 250 एकर जमिनीचाही या शासकीय जमिनीत समावेश आहे. समुद्रसपाटीपासून 200 मीटर उंच असलेल्या या पठारावरील वातावरण नवी मुंबई शहरापेक्षा वेगळे आहे. चारही बाजूने डोंगररांगा, निर्सगसंपदा या भागात दिसून येते. पावसाळ्यात तर पांडवकडा आणि इतर स्थळाने या परिसरातील निसर्गसौंदर्यात भर घातली आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या या जागेचा विनियोग करण्याचा सिडकोने निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर 2008 मध्ये या पठारावर थीम पार्क उभारण्याची परवानगी सिडकोने राज्य शासनाकडून मागितली. त्याला परवानगी मिळाल्यानंतर सिडकोने जानेवारी 2010 मध्ये या संपूर्ण जमिनीची ‘थीम पार्क’साठी निविदा प्रसिद्ध केली. त्याला देशातील अनेक बड्या बांधकाम कंपन्यांनी प्रतिसाद दिला. यात सध्या विमानतळाचे काम करणार्या जीव्हीके कंपनीचाही समावेश आहे, मात्र ही निविदा फ्युचर सिटी प्रा. लि. कंपनीला मिळाली. त्याचवेळी नवी मुंबई विमानतळ परिसरात नागरी उड्डाण मंत्रालयाने 120 मीटर उंचीच्या बांधकामांना मज्जाव केला. त्यामुळे अगोदरच 200 मीटर उंच असलेल्या खारघर हिल प्लॅटयूचा प्रस्ताव या अटी-शर्थीमध्ये अडकला. या संपूर्ण थीम पार्कसाठी फ्युचर सिटीने एक हजार 530 कोटी रुपये देकार दिला होता. या ठिकाणी ही बांधकाम कंपनी मनोंरजन क्षेत्र उभारणार होती. सिडकोने राज्य शासनाच्या परवानगीने या ठिकाणी 60 टक्के वाणिज्य आणि 40 टक्के निवासी क्षेत्राची तरतूद केली होती. त्यामुळे निवासी क्षेत्रात मोठया प्रमाणात नागरी वसाहत निर्माण केली जाणार होती. विमानतळ परिसर बांधकाम उंची मर्यादा आता 50 टक्क्यांनी कमी करण्यात आलेली आहे. हे त्या बांधकाम क्षेत्र व विमानतळ यांच्या अंतरावर अवलंबून आहे. त्यामुळे हा प्रकल्प नव्याने सुरू करण्याचा सिडकोचा प्रयत्न सुरु झाला आहे.
सिडकोने विमानतळ आणि हाऊसिंग या दोन प्रकल्पांवर लक्ष केंद्रीत केले आहे मात्र त्याचवेळी खारघर कॉर्पोरेट पार्क, मेट्रो सारख्या प्रकल्पांना चालना दिली जात आहे. विमानतळ उंची मर्यादा कमी झाल्याने खारघर हिल प्लॅटयूचा उपयोग एखाद्या थीम प्रकल्पासाठी करता येण्यासारखा आहे.
-लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडको