Breaking News

नववर्षाचे स्वागत वृक्षारोपणाने

पनवेल : बातमीदार

रात्री उशिरापर्यंतच्या पार्ट्या करून नववर्षाचे स्वागत करणारी मंडळी गाढ झोपेत असताना खारघरच्या ’अ‍ॅडॉप्ट द नेचर’ ग्रुपच्या सदस्यांनी एकत्र येऊन नववर्षाचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने केले. खारघर हिल, सेक्टर 35 येथील तलावाच्या शेजारी वृक्षारोपण करून निसर्गाप्रती जागरूक असलेल्या नागरिकांनी 55 झाडांचे रोपण केले. ’अ‍ॅडॉप्ट द नेचर’ नावाचा ग्रुप खारघरमध्ये निसर्ग वाचविण्यासाठी प्रयत्न करतो. निसर्गाशी संबंधित अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्याकडून राबविले जातात. 2020 या नव्या वर्षाचे स्वागत झाडे लावण्यापासून करण्याची संकल्पना या ग्रुपच्या काही मंडळीच्या मनात आल्यानंतर ती प्रत्यक्षात राबविण्यात आली. सकाळी सात वाजता सर्व सदस्यांनी एकत्र येत खारघर सेक्टर 35 येथील तलावाच्या शेजारी 25, तसेच खारघर हिलवर 25 अशा एकूण 50 झाडांचे रोपण केले. याशिवाय टाटा कर्करोग रुग्णालयासमोरील बसथांब्याच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून या ठिकाणीदेखील पाच झाडे लावण्यात आली. नव्या वर्षाचे स्वागत सकारात्मक उपक्रमाने करायचे म्हणून आम्ही हा उपक्रम राबविला असून वर्षाच्या पहिल्याच दिवशी लावलेल्या झाडांना वर्षभर सांभाळणे, हा आमचा संकल्प असणार आहे, असे धर्मेंद्र कर यांनी सांगितले. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानात बदल होत चालला आहे, या बदलाला वेळीच आवर घालायचा असेल तर निसर्गाला आपलेस केल्याशिवाय पर्याय नाही आणि निसर्ग जपण्याची जबाबदारी सरकारची किंवा लोकप्रतिनिधींची नसून नागरिकांची आहे, म्हणून आम्ही हा उपक्रम राबवित असल्याचे या ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले. नव्या वर्षाच्या स्वागताला वृक्षारोपण करण्याच्या मोहिमेत अमरनाथ सिंग, दीपाली लाभे, डॉ. जया पवार, डॉ. स्वप्नील पवार आदींसह 89 वर्षांचे डॉ. टी. एन. गांजो हेदेखील सहभागी झाले होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply