Breaking News

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कामाला वेग

अंतिम टप्प्यात असलेली कामे लवकरच पूर्ण करण्याचा सिडकोचा मानस

पनवेल : बातमीदार

नवीन वर्षात मागील वर्षी पूर्ण करता न आलेल्या कामांना मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीमधील गाभा क्षेत्रातील पूर्ण न झालेली प्राथमिक कामे वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न या वर्षी केला जाणार आहे. विमानतळासाठी धावपट्टी उभारण्याचे काम या वर्षी जोमाने सुरू केले जाणार आहे. त्यासाठी अंतिम टप्प्यात असलेली सर्व विकासपूर्व कामे पुढील काही महिन्यांतच पूर्ण करण्याचा सिडकोचा मानस आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीमध्ये सर्वप्रथम धावपट्टी उभारणे या कामाला प्राधान्य दिले गेले आहे. यासाठी जमीन सपाटीकरण सुरूही झाले आहे. मात्र त्याबरोबरच विकासपूर्व कामे अजूनही पूर्णपणे मार्गी लागलेली नाहीत. टेकडी फोडण्यासह त्या भागाचे सपाटीकरण, उलवा नदीचे पात्र बदलून तयार करण्यात आलेला नवीन प्रवाहाचे काम आणि दहापैकी दोन गावांचे स्थलांतर होणे अजून बाकी आहे. ही सर्व कामे 2019अखेरपर्यंत मार्गी लागणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात असे काही झालेले नाही. ही सर्व कामे आजही अंतिम टप्प्यात आहेत. गाभा क्षेत्रातील टेकडी फोडण्याचे काम झाले आहे तर क्षेत्राबाहेरील टेकड्या सपाट करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. उलवा नदीचे नैसर्गिक पात्र बदलून एका दिशेला वळवण्यात आले आहे. यासाठी नदीच्या दोन्ही बाजूंना गेबियन पद्धतीने भिंत उभारण्यात आली आहे, तिचे काम आत्ता अंतिम टप्प्यात आहे. नदीच्या वर एका ठिकाणी पूलही उभारण्यात आला आहे. तसेच, दहा गावांचे स्थलांतर हे सर्वात मोठे आव्हान सिडकोसमोर होते. तेही आत्ता संपुष्टात आल्यात जमा आहे. दहापैकी आत्ता केवळ दोन गावांतील 40 ते 50 कुटुंबांनी अजूनही स्थलांतर केलेले नाही. त्यांचे वैयक्तिक स्वरूपातील काही प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावर सध्या चर्चा सुरू आहे. हे प्रश्न सुटले की ग्रामस्थ गाव पूर्णपणे रिकामे करणार आहेत. त्यामुळे हा प्रश्नही अंतिम टप्प्यात आहे. धावपट्टीशी संबंधित दोन हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे ग्रीनफिल्ड विमानतळ असणार आहे. त्यासाठी दोन हजार 268 हेक्टर इतकी जमीन संपादित झाली असून प्रत्यक्षात 1160 हेक्टरवर धावपट्टी आणि टर्मिनल उभारले जाणार आहे. यात धावपट्टी उभारण्याचे काम सर्वप्रथम केले जाणार आहे. त्यानंतर टर्मिनल उभारणीचा विचार केला जाणार आहे. धावपट्टी आणि टर्मिनल उभारणीचे काम जीव्हीके लॅन्ड या बांधकाम कंपनीला देण्यात आले आहे.

या वर्षी मागे राहिलेली कामे मार्गी लावली जातील. जमीन विकासाची कामेही काही दिवसांतच पूर्ण केली जातील.

-राजेंद्र धायटकर, मुख्य इंजिनीअर, नवी मुंबई विमानतळ प्रकल्प

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply