खोपोली : प्रतिनिधी
पोलिसांनी कायदा सुव्यवस्था चोख ठेवावी, यासंबंधीचे निवेदन भाजप खोपोली शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल व शहर सरचिटणीस हेमंत नांदे यांनी खोपोली पोलिसांना दिले आहे. देशभरात संविधान वाचवा या नावाने काही राजकीय पक्षांच्या वतीने रॅली काढून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यात आंदोलनकर्त्यांनी हिंसाचार केला, राष्ट्रीय संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खोपोलीत अशी घटना घडू नये याकरिता पोलिसांनी विशेष खबरदारी घ्यावी असे भाजपच्या वतीने निवेदनात म्हटले आहे. शुक्रवारी सकाळी अशा आशयाचे निवेदन भाजपच्या वतीने पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांना देण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल सरचिटणीस हेमंत नांदे, मीडिया सेलचे प्रिन्सी कोहली, जाधव उपस्थित होते. नागरिक दुरुस्ती, कॅब, एनआरसी आदी कायदे या देशात राहणार्या कुठल्याही नागरिकांच्या विरोधात नाहीत, मात्र विरोधकांकडून गैरसमज पसरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याने कुठल्याही मोर्चात नागरिकांनी सहभागी होऊ नये, असे आवाहन हेमंत नांदे यांनी केले.