मदन भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश
सहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार मदन भोसले यांनी हजारो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी
(दि. 9) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्याच्या काँग्रेसवर मोठा वज्राघात झाला आहे.
मदन भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यामुळे वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत. एकेकाळी सातारा जिल्हा काँग्रेसची धुरा समर्थपणे सांभाळणार्या भोसले यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अगोदरच गटा-तटात विखुरलेली व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताकदीपुढे हैराण झालेली राष्ट्रीय काँग्रेस भोसले यांच्या भाजपमध्ये जाण्याने आणखी कमजोर होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे भोसले यांच्या प्रवेशामुळे भाजपला सातारा जिल्ह्यामध्ये वक्तृत्वात पारंगत असलेला, जनाधार असलेला व कामाचा प्रचंड डोंगर उभा केलेला वजनदार नेता मिळाला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.